औरंगाबाद : बेकायदा शस्त्रास्त्रे बाळगल्याच्या गुन्ह्यातील आरोपी शुभम सूर्यकांत सुरळे, अजिंक्य शशिकांत सुरळे आणि रोहित राजेश रेगे यांचे जामीन अर्ज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यू.पी. देवर्षी यांनी मंगळवारी (दि.२८) नामंजूर केले.
बेलापूर, नवी मुंबई येथील सीबीआयचे उपअधीक्षक मारुती शंकर पाटील यांच्या फिर्यादीनुसार डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास सीबीआय करीत आहे. या गुन्ह्यात अटक आरोपी सचिन अंदुरे याने त्याचा मेव्हणा शुभम सूर्यकांत सुरळेकडे घातक शस्त्र ठेवल्याची कबुली दिली होती. त्यावरून सीबीआयने कारवाई करून वरील तिघा आरोपींना अटक करून त्यांच्याकडून पिस्टल, कुकरी आदी घातक शस्त्रे जप्त केली होती.
आरोपींनी दाखल केलेल्या जामीन अर्जास विरोध करताना सहायक सरकारी वकील ढोकरट यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, गुन्ह्याचा तपास प्राथमिक अवस्थेत आहे. गुन्ह्यात आणखी कोण सहभागी आहे, याचा तपास करावयाचा आहे. आरोपींना जामीन मंजूर करू नये, अशी विनंती त्यांनी केली असता न्यायालयाने वरीलप्रमाणे आदेश दिला.