पुणे : एल्गार परिषद व कोरेगाव भीमा प्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला आहे. यात सुरेंद्र गडलिंग, शोमा सेन, वरवरा राव, महेश राऊत, सुधीर धवळे, रोना विल्सन असे जामीन अर्ज फेटाळण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत..एल्गार परिषद प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांचा जामीन फेटाळण्याची मागणी सरकारी पक्षाच्या वतीने बुधवारी सत्र न्यायालयात पुन्हा एकदा करण्यात आली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी अटक करण्यात आलेले सुरेंद्र गडलिंग, सुधीर ढवळे, महेश राऊत, शोमा सेन, रोना विल्सन, वरवरा राव यांच्या जामिनावर सत्र न्यायाधीश नावंदर यांच्या न्यायालयात सुनावणी पार पडली. बचाव आणि सरकारी दोन्ही पक्षाचा जामीन अर्जावरील युक्तीवाद संपल्यानंतर बुधवारी 6 नोव्हेंबर रोजी निकाल देण्यात आला आहे. सरकारी पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी बाजु मांडली. यावेळी पवार म्हणाल्या, भारतात क्रांती घडवून आणणे, ज्या भागात पोलिस यंत्रणा कमी आहे त्या भागात असंतोष घडवून आणणे, सामाजिक उद्रेक घडून येतील याप्रमाणे कार्यक्रम घेणे आदी माओवाद्याची व्यूहरचना, डावपेच आहेत. अटक करण्यात आलेल्यांचा घरातील छाप्यात, तपासा दरम्यान अनेक कागदपत्रे सापडले. त्यात माओवाद्यांच्या व्यूहरचना आणि डावपेचांची कागदपत्रे तपासात मिळून आली आहे. पोलिसांनी केलेला तपास हा फक्त एल्गार परिषद आणि कोरेगाव भिमा येथे घडलेल्या हिंसाचार पुरता नाही. त्यापुढे जावून तपासात बंदी असलेल्या संघटनेशी (माओवादी) संबंध असल्याचे अनेक पुरावे सापडले आहेत. यापूर्वी सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाने जामीन फेटाळला असल्याचे पवार यांनी न्यायालयास सांगितले.