पुणे : आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून ठेवी स्वीकारुन गुंतवणुकदारांची कोट्यावधींची फसवणूक केल्या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी (डीएसके) यांचे बंधु मकरंद कुलकर्णी यांचा जामीन न्यायालयाने मंजूर केला आहे़. पुण्यासह राज्यभर गाजलेल्या या प्रकरणातील स्वत: डी एस के, त्यांची पत्नी हेमंती, मुलगा शिरीष कुलकर्णी, त्यांचे काही कुटुंबीय आणि नातेवाईक सध्या न्यायालयीन कोठडीत येरवडा कारागृहात आहेत़
मकरंद कुलकर्णी (वय ६७) यांच्यावतीने अॅड़ रोहन नहार यांनी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता़ दोन्ही बाजूंचे युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने १ लाख रुपयांचे जात मुचलक्यावर त्यांचा काही अटीवर जामीन मंजूर केला आहे़ अॅड़ नहार यांनी आपल्या युक्तीवादात न्यायालयात सांगितले की, मकरंद कुलकर्णी यांच्या विरोधात प्रथमदर्शनी कोणताही सबळ पुरावा नाही़ त्यांनी कोणत्याही गुंतवणुकदाराकडून पैसे स्वीकारले नाहीत़ त्यांनी डी एस के यांच्याशी संबंधित कंपनीचे काम १९९३ मध्येच सोडलेले असून या गुन्ह्यांशी त्यांचा कोणताही संबंध नाही़ डी एस के पतीपत्नीच्या अटकेनंतर त्यांचे बंधू मकरंद कुलकर्णी हे अमेरिकेला पळून जाण्याचा प्रयत्न करत होते़ त्यांना पोलिसांनी मुंबई विमानतळावर १३ आॅगस्ट २०१९ रोजी अटक केली होती़ त्यानंतर त्यांच्याविरोधात ७ नोव्हेंबर २०१९ रोजी पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते़ कुलकर्णी यांनी फुरसुंगी येथील जागा शेतकºयांकडून ४ कोटी ८७ लाख रुपयांना विकत घेतली व ती जागा डीएसकेडीएल कंपनीला ९ कोटी २९ लाख रुपयांना बेकायदेशीररित्या विक्री केल्याचा त्यांच्या आरोप आहे़