कऱ्हाड : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना मेलवरुन जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी एका युवकाला अटक केली. सोमवारी पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान वकीलांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन त्या युवकाला जामीन मंजूर करण्यात आला आहे.
अंकुश शंकरराव सवराते (वय २३, रा. आलेगाव, पो. कावळगाव, ता. पुर्णा, जि. परभणी, सध्या रा. बालाजीनगर, धनकवडी) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. दरम्यान, न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर बचाव पक्षाच्या वकिलांकडून न्यायालयात जामिनासाठी अर्ज सादर करण्यात आला. त्यावर न्यायालयाने आरोपी युवकाला जामीन मंजूर केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यालयीन मेलवर रविवारी पहाटे धमकीचा मेल आला होता. आमदार चव्हाण यांना जीवे मारण्याची धमकी त्या मेलच्या माध्यमातून देण्यात आली होती. याबाबत कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर जिल्हा पोलीस दलाने तातडीने हालचाली केल्या. पोलिसांनी केलेल्या तांत्रिक तपासातून संबंधित मेल नांदेडमधून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली.
त्यानुसार कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याचे एक पथक आरोपीच्या शोधासाठी नांदेडला रवाना झाले. त्यानंतर आरोपी राजगड येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर दुसऱ्या पोलीस पथकाने तेथून आरोपीला ताब्यात घेतले. रविवारी रात्री उशिरा त्याला कऱ्हाडात आणण्यात आले. त्याच्यावर माहिती तंत्रज्ञान कायद्यासह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आले.
दरम्यान, सोमवारी दुपारी आरोपी अंकुश सवराते याला प्रथमवर्ग न्या. एम. व्ही. भागवत यांच्यासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर बचाव पक्षाच्या वकिलांनी आरोपीचा जामीन अर्ज सादर केला. त्यावर न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर केला आहे.
बचाव पक्षाने केलेला युक्तिवाद...आरोपीवर लावण्यात आलेली भादविसं कलम ५०५ आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६७ ही कलमे या गुन्ह्यात लावता येत नाहीत. तसेच इतर कलमे जामिनपात्र आहेत. त्यामुळे आरोपीला पोलीस कोठडी देऊ नये, असा युक्तिवाद बचाव पक्षाचे वकील अड. महादेव साळुंखे यांनी न्यायालयात केला. हा युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावल्याचे बचाव पक्षाच्या वकिलांनी सांगितले.