ठाणे - विनयभंगाच्या आरोपातून जामीनावर सुटल्यानंतर पत्नीशी झालेल्या कडाक्याच्या भांडणामुळे आणि मारहाणीमुळे व्यथित झालेल्या रिलायन्स वाशी (नवी मुंबई) येथील कंपनीचा व्यवस्थापक अभिशेषकुमार शर्मा (वय 38) यांनी 25 व्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल रात्री 9 वाजताच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत शर्मा हे ठाण्यातील कोलशेत परिसरातील लोढा- आमरा येथे राहत होते. विवाहित असलेल्या अभिशेषकुमारला एक सहा वर्षाचा मुलगा आहे. आपल्याच कार्यालयात सहकारी महिलेने त्याच्यावर विनयभंगाचा आरोप केल्यानंतर त्याला 28 नोव्हेंबर रोजी अटक झाली होती. हे प्रकरण ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आले होते. सोमवारी 3 डिसेंबर रोजी ठाणे न्यायालयाने त्याची सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास जामिनावर सुटका केली. विनयभंगाच्या प्रकरणात त्याला अटक झाली. 28 नोव्हेंबर रोजी शर्माची पत्नी पोर्णिमा (वय 30) हिला त्याचे हे प्रकरण समजले. सोमवारी सायंकाळी तो जामिनावर सुटल्यानंतर मात्र, तिने या प्रकरणी जाब विचारुन त्याला फैलावर घेतले. त्याच्या आई वडीलांसमोरच तिने चांगलाच पानउतारा करत त्याच्याशी कडाक्याचे भांडण केले. तिचा संयम सुटल्यानंतर तिने यातूनच त्याला मारहाणही केली. आधी पूर्वीच्या मैत्रिणीने केलेल्या विनयभंगाच्या गुन्हयात झालेली अटक आणि त्यानंतर पत्नीने आई वडीलांसमोरच जाब विचारत केलेले कडाक्याचे भांडण यातून व्यथित होऊन आपल्याच लोढा- आमरा या इमारतीच्या 25 व्या मजल्यावरील घराच्या गॅलरीतून उडी घेऊन आत्महत्या केल्याचे कापूरबावडी पोलिसांनी सांगितले.