खंडणीप्रकरणी काँग्रेस नेत्याचा जामीन नामंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 05:12 PM2019-07-24T17:12:04+5:302019-07-24T17:22:53+5:30
नगरसेवकाकडे मागितले होती 50 लाख रुपयांची खंडणी
नालासोपारा - नगरसेवकाने अनधिकृत बांधलेल्या इमारतीची माहिती अधिकारात मागवून अपिलात जाणार किंवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करू अशी धमकी देऊन 50 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या काँग्रेस नेता कुमार काकडे याच्या विरुद्ध वसई पोलीस ठाण्यात 29 मे 2019 ला वेगवेगळ्या कलमानव्ये खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. पण त्याला वसई न्यायालयाने अंतरिम जामीन देऊन सुनावणीची तारीख दिली होती. त्याच कालावधीत न्यायाधीशांची बदली झाल्याने थोडासा अवधी लागल्याने सुनावणीची तारीख पुढे ढकलली जात होती. या केसच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने आरोपी विरोधात भक्कम आणि सबळ पुरावे असल्याने त्याचा जामीन नामंजूर केला आहे. कुमार काकडे असे खंडणी दाखल झालेल्या काँग्रेस नेत्याचे नाव असून या फरार नेत्याला पोलीस कधी पकडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रकरण नेमके काय आहे ?
नगरसेवक अरुण जाधव यांनी बांधलेल्या इमारतीच्या प्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात 2016 साली गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात जामिनावर खुला झाल्यानंतर कुमार काकडे याने अपिलात जाऊन दुसऱ्या बांधकामाची कागदपत्रे मिळाली असून ती दाखवून 50 लाख रुपयांची खंडणी मागितली. यापूर्वी गुन्हा दाखल झाल्याने अब्रू जाईल या भीतीने नावाची खराबी होऊ नये म्हणून कुमार नाईक यांच्या मध्यस्थीने सप्टेंबर 2016 साली शेवटच्या आठवड्यात भुईगाव येथील जाप आळीमधील स्वामी गुरुदत्तच्या आश्रमातील मठात 10 लाख रुपये रोख स्वीकारले. त्यानंतर 27 ऑक्टोबर 2016 साली संध्याकाळी साडे सातच्या सुमारास सदर मठात अरुण जाधव कडून काकडे याने 20 लाख रुपये घेतले होते. व उर्वरित 20 लाख रुपये मार्केट मध्ये मंदी असल्या कारणाने दिवाळीनंतर देतो असे सांगण्यात आले होते. पण कुमार काकडे हा पूर्ण पैश्यांचा व्यवहार झाल्यानंतर पलटू नये व परत दुसऱ्या कोणत्या कारणावरून दम देऊ नये याकरिता 27 ऑक्टोबरला मठात कुमार काकडेला पैसे देत असताना व्हिडीओ आणि व्हाईस रेकॉर्डिंग करण्यात आले आहे. उर्वरित 20 लाख रुपये अरुण जाधव काकडेला देऊ न शकल्याने वारंवार न्यायालायत अपिलमध्ये जाण्याची व पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याची धमकी देत होता.
सदर आरोपीचा जामीन वसई न्यायालयाने नामंजूर करून फेटाळला आहे. फरार आरोपीचा शोध घेत असून लवकरात लवकर पकडण्यासाठी प्रयत्न करत आहे. - रणजित मोहिते (तपास अधिकारी आणि पोलीस उपनिरीक्षक, वसई पोलीस ठाणे)
30 लाख रुपयांची खंडणी घेतल्याचे ऑडिओ आणि व्हिडीओ रेकॉर्डिंग असल्याने वसई पोलीस ठाण्यात खंडणीची तक्रार दिली होती. त्याला अटक करून पोलिसांनी या प्रकरणाची खोलवर तपासणी केली तर अनेक प्रकरणे उघड होतील. - शेखर जाधव (तक्रारदार)