मडगाव - गोव्यातील दक्षिण गोव्यातील सीमेवरील काणकोण तालुक्यातील पोळे येथील चेक नाक्यावर परराज्यातील ट्रक चालकाकडून हप्ते वसुल करण्याच्या आरोपाखाली अटक केलेला आरटीओ अधिकारी वामन प्रभू याला आज सर्शत जामीन मंजूर झाला. भ्रष्टाचार प्रतिंबधक दावे हाताळणारे खास न्यायाधीक्ष बी.पी.देशपांडे यांच्या न्यायालयाने संशयिताला पन्नास हजार व तितक्याच रक्कमेचा एक हमिदार तसेच भ्रष्ट्राचार प्रतिबंधक पोलीस चौकशीत बोलावतील तेव्हा हजर राहणो व अन्य अटीवर त्याला हा जामीन मंजूर झाला. दरम्यान या छाप्याच्यावेळी अटक केलेल्या बसवराज गुरजनवार व जिंतेद्र वेळीप या दोघांनीही जामिनासाठी अर्ज केला असून उदया या अर्जावर युक्तीवाद होईल.भ्रष्टाचार प्रतिबंधक दावे हाताळणारे खास न्यायाधीश बी. पी. देशपांडे यांच्या न्यायालयाने वामन प्रभू याच्या जामीन अर्जावर निर्णय दिला. संशयिताच्यावतीने अॅड. पराग राव व अॅड. अमेय प्रभूदेसाई यांनी बाजू मांडली. या कथित भ्रष्टाचार प्रकरणात आपल्या अशिलाचा कुठलाही हात नसल्याचा दावा या वकीलव्दयीनी जामिन अर्जावरील युक्तीवादात केला होता. भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी बुधवारी पहाटे पोळे चेक नाक्यावर छापा टाकून प्रभू याच्यासह बसवराज गुरजनवार व जितेंद्र वेळीप याना अटक केली होती. त्यांच्याकडून 16,500 रुपयांची रोख जप्त केली होती. प्रभू याच्या सांगण्यावरुन इतर दोन एजंट ट्रकवाल्यांकडून पैसे घेत होते असा पोलिसांचा दावा होता. आज जामीन अर्जावरील निवाडयाच्यावेळी भ्रष्टाचार प्रतिबंधक पोलीस विभागाचे पोलीस निरीक्षक गुरुदास कदम हेही न्यायालयात हजर होते.
लाचखोर आरटीओ अधिकारी वामन प्रभूला सर्शत जामीन मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2018 7:26 PM