लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बैतुल येथील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या एका आठव्या इयत्तामधील ग्रामीण विद्यार्थिनीने सामूहिक अत्याचारानंतर स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. नागपुरातील रुग्णालयात उपचारादरम्यान बुधवारी तिचा मृत्यू झाला.मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली होती. ९० टक्के जळाल्याने ती गंभीर होती. होती. बैतूल येथील जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर तिला नागपुरातील रुग्णालयात रेफर करण्यात आले होते. मात्र बुधवारी सकाळी ९ वाजता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून सर्व तिन्ही आरोपींना अटक केली. ते सर्वजण कॅटरिंग आणि वाहन चालविण्याचे काम करतात. या तिघांनी महिनाभरापूर्वी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला होता. त्यानंतरही ते तिला सतत त्रास देत होते, अशी माहिती आहे.बैतूलचे पोलीस अधीक्षक धर्मेंद्रसिंह भदौरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, या तिन्ही आरोपींविरोधात पॉक्सो कायद्यासह कलम ३७६, (ड), ३७६ (२) लावण्यात आले आहेत. तिच्या मृत्यूनंतर ३०२ कलमही लावले आहे. पीडितेच्या मृत्यूपूर्व बयानाच्या आधारावर आरोपी संदीप बिसाने याला अमरावतीमधून, नीतेश नागले याला कालडोंगरी येथून तर तिसरा फरार आरोपी अजय चौरासे याला बुधवारी भोपाळमधून अटक करण्यात आली.पीडितेने जाळून घेतल्याच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक धर्मेंद्र सिंह भदौरिया आणि सहायक पोलीस अधीक्षक श्रद्धा जोशी यांनी रात्रीच रुग्णालयात जाऊन पीडितेची भेट घेतली आणि जाबजबाब नोंदविले. आपल्या मृत्यूला संदीप हा जबाबदार असल्याचा उल्लेख असलेली एक चिठ्ठी तिच्याजवळ मिळाली होती. त्यात एक मोबाईल नंबरही लिहिलेला होता. मृत्यूपूर्व बयानामध्ये तिघांनी सामूहिक अत्याचार केल्याचे सांगितले होते. नागपुरात शवविच्छेदन झाल्यावर तिचे प्रेत नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. प्रेत नेण्यासाठी पोलिसांनी वाहनाची व्यवस्था करून दिली. पीडितेचे कुटुंबीय अत्यंत गरीब असल्याने सर्वतोपरी सहकार्य केले जात असल्याचे बैतूल पोलिसांनी सांगितले.