मुंबई - कांजुरमार्ग येथील बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात गोळीबार करणाऱ्या कुख्यात गुंड कुमार पिल्लाई गॅंगच्या हस्तकाला पकडण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. भास्कर राजू पुजारी असं या आरोपीचे नाव असून त्याच्या विरोधात मुंबईत दोन गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. मागील अनेक वर्षांपासून पुजारी हा कर्नाटकात लपून बसला होता. अनेक गंभीर गुन्ह्यात पुजारीचा सहभाग असल्याने पोलिस त्याच्या मागावर होते. मात्र वर्षभरापूर्वीत कर्नाटकात पुजारी हा लपून बसला असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. पुजारी हा पिल्लईच्या खास विश्वासू साथीदारांपैकी एक होता.
कुमार पिल्लाईच्या अटकेनंतर पोलिसांनी या टोळीच्या सराईत गुन्हेगारांची धरपकड सुरू केली. या टोळीतील अनेक महत्त्वाच्या गुन्हेगारांना पोलिसांनी जेरबंद केलं. दरम्यान 10 नोव्हेंबर, 2009 मध्ये आरोपीने त्याच्या साथीदारांच्या मदतीने एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयावर गोळीबार केला होता. या गुन्ह्यातील आरोपी भास्कर पुजारी याचा थांग-पत्ता पोलिसांना लागत नव्हता. पुजारी विरोधात पोलिसांनी हत्येचा प्रयत्न, खंडणी आणि हत्यार बंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. यापूर्वी 9 नोव्हंबर, 2009 ला विक्रोळीतील बांधकाम व्यावसायिक रमेश शहा यांच्या कार्यालयात गोळीबार करत खंडणीची मागणी केली होती. यापूर्वी बांधकाम व्यावसायिकाला परदेशातून धमकीचे फोन आले होते.