नवी मुंबई : कोविड रुग्णांच्या उपचारासाठी वापरलेल्या जुन्या हातमोजांची विक्री करणाऱ्या रॅकेटचे बंगळुरू कनेक्शन समोर आले आहे. राज्यात तीन ठिकाणी छापे मारून चौघांना अटक केल्यानंतर तेथील माहिती समोर आली आहे. शिवाय हैदराबाद येथेही जुन्या हातमोजांचा साठा असल्याची माहिती अटक आरोपींकडून उघड झाली आहे.
देशभरात कोविडचा प्रादुर्भाव वाढत असतानाच, कोविड योद्ध्यांच्या आरोग्याशी खेळ करणारे कृत्य नवी मुंबई गुन्हे शाखा पोलिसांनी उघडकीस आणले आहे. कोविड रुग्णांच्या उपचारासाठी वापरण्यात आलेले हातमोजे धुऊन पुन्हा विक्री करणारे रॅकेट पावणे एमआयडीसी येथील छाप्यानंतर उघडकीस आले आहे.
या कारवाईत अद्यापपर्यंत पावणेसह भिवंडी व औरंगाबाद येथे छापे मारण्यात आले आहेत. त्यामध्ये सुमारे ३८ टन जुने हातमोजे जप्त करण्यात आले आहेत; तर चौघांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी प्रशांत सुर्वे याला न्यायालयाने २६ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. विपुल शहा, अफरुज शेख व नझीम खान यांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना २७ आॅगस्टपर्यंतची पोलीस कोठडी मिळाली आहे.
चौघांच्या अटकेनंतर त्यांच्याकडून बंगळुरूमधील काही व्यक्तींची माहिती पोलिसांना मिळाली आहे; तसेच भिवंडी, औरंगाबाद व नवी मुंबईत पुरविण्यात आलेले जुने हातमोजे बंगळुरू येथूनच पाठविण्यात आल्याचीही कबुली त्यांनी दिली आहे. यामुळे राज्यात इतरही ठिकाणी अद्याप अशा प्रकारे जुन्या वैद्यकीय हातमोजांचा साठा असण्याची शक्यता वर्तविली जात आहे; शिवाय हैदराबाद येथेही काही प्रमाणात साठा असल्याची माहिती अटकेतील आरोपींकडून पोलिसांना मिळाली आहे. या कारवाईत पावणेसह भिवंडी व औरंगाबाद येथे छापे मारण्यात आले आहेत.कोविड योद्ध्यांच्या आरोग्यावर प्रश्नचिन्हकोविड रुग्णांवर उपचारासाठी वापरलेले हातमोजे नष्ट न करता, पुन्हा त्यांची विक्री करणारे रॅकेट देशभरात चालत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, या प्रकारामुळे ज्या ठिकाणी जुन्या हातमोजांचा पुरवठा झालेला आहे, ते वापरणाºया कोविड योद्ध्यांच्या आरोग्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे; परंतु या रॅकेटच्या मुळाशी पोलीस अद्याप पोहोचू शकले नसल्याने सूत्रधार अद्यापही पडद्याआड आहेत.