बंगळुरूमध्ये ऑनर किलिंगचे प्रकरण समोर आले आहे. याठिकाणी एका व्यक्तीने आपल्याच मुलीची चाकूने वार करून हत्या केली आहे. दरम्यान, आरोपीच्या मुलगी त्याच्या इच्छेविरुद्ध एका तरुणाच्या प्रेमात पडली आणि संधी पाहून तरुणासोबत पळून गेली. त्यानंतर पोलिसांनी मुलीला ताब्यात घेऊन आरोपीच्या ताब्यात दिले असता आरोपीने तिला घरी आणून तिची हत्या केली. या घटनेनंतर आरोपीने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आणि घटनेची कबुली दिली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण बंगळुरूच्या परप्पाना अग्रहारा येथील आहे. मूळचे म्हैसूरमधील एचडी कोटे येथील शेतकरी गणेश शरदम्मा याने स्वतःची मुलगी पल्लवीची हत्या केली. प्राथमिक तपासात पल्लवीचे एका मुलावर प्रेम होते, मात्र गणेश शरदम्मा तिचे नाते मान्य करण्यास तयार नव्हता. त्यामुळे एके दिवशी पल्लवी तिच्या प्रियकरासह घरातून पळून गेली. याप्रकरणी गणेश शरदम्माने पोलिसांत फिर्याद दिली होती.
मुलगी अल्पवयीन असल्याने गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तिचा शोध घेऊन तिला गणेश शरदम्माच्या ताब्यात दिले. आपल्या मुलीला पोलीस ठाण्यातून घेऊन गणेश शरदम्मा घरी पोहोचला. यानंतर घरी दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. दरम्यान, आरोपी गणेश शरदम्माने चाकूने मुलीवर जबर हल्ला केला. यामुळे पल्लवीचा जागीच मृत्यू झाला. गुन्हा केल्यानंतर आरोपी गणेश शरदम्माने स्वतः पोलिस ठाण्यात येऊन पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. त्याने गुन्ह्याची कबुली देत आपल्या मुलीची हत्या आपणच केल्याचे सांगितले.
सध्या पोलिसांनी गणेश शरदम्माला अटक करून कारागृहात पाठवले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश शरदम्माने त्याच्या मुलीवर हल्ला केला, तेव्हा त्याची पत्नी आणि इतर कुटुंबीयांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपीचे रागाच्या भरात त्याच्या कुटुंबीयांवरही हल्ला केला. त्यामुळे गणेश शरदम्माची आई शारदम्मा आणि काका शांता कुमार गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेबाबत पल्लवीची काकी गीता यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.