बंगळुरु - महालक्ष्मी हत्याकांड प्रकरणी मुख्य आरोपीने ओडिशाच्या भद्रक जिल्ह्यातील गावात बुधवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचा मृतदेह एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला. त्याचे नाव मुक्तीरंजन रॉय असं आहे. त्याच्याजवळ पोलिसांना एक डायरी सापडली ज्यात महालक्ष्मीच्या हत्येची कबुली देण्यात आली आहे. महालक्ष्मी आणि रंजन २०२३ पासून एकमेकांना ओळखत होते, दोघे एकत्र काम करायचे, दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचंही समोर आले.
२० सप्टेंबरला बंगळुरूच्या व्यालिकावल परिसरात बसप्पा गार्डनजवळील ३ मजली इमारतीत फ्लॅटमध्ये २९ वर्षीय महालक्ष्मीचा मृतदेह आढळला. तिच्या मृतदेहाचे ५९ तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले होते. या प्रकरणातील संशयित ओडिशात असल्याची माहिती मिळाली. आरोपीला पकडण्यासाठी पोलीस पथके नेमली. बंगळुरू पोलीस आरोपीचा शोध घेत होती. महालक्ष्मीचं लग्न हेमंत दासशी झालं होते. हेमंत मोबाईलच्या दुकानात काम करत होता. त्यांना ४ वर्षाची मुलगीही होती. महालक्ष्मी आणि हेमंत हे ४ वर्षापासून वेगवेगळे राहतात. दोघांचा अद्याप घटस्फोट झाला नाही.
पोलीस तपासात सीसीटीव्ही फुटेजमधून हत्येच्यादिवशी रात्री २ लोक स्कूटीहून महालक्ष्मीच्या घरी आले होते. पोलिसांनी या प्रकरणी अशरफ नावाच्या हेअर ड्रेसरशीही चौकशी केली. त्यानंतर या प्रकरणी महालक्ष्मीच्या ऑफिसमधील मॅनेजर आणि इतर २ सहकाऱ्यांवरही हत्येचा संशय होता. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत चौकशी करून सोडून दिले. मुख्य आरोपी ओडिशा राहणारा होता आणि तो फरार होता.
हत्येची कबुली
ओडिशात मुख्य आरोपीने मृत्यूपूर्वी सुसाईड नोट लिहिली त्यात महालक्ष्मीच्या हत्येची कबुली त्याने दिली आहे. हे दोघे एकत्र काम करत होते, या दोघांमध्ये अन्य व्यक्तीसोबत असलेल्या नात्यावरून वारंवार वाद व्हायचे. तो व्यक्ती कोण याचा खुलासा झाला नाही. महालक्ष्मी अखेरचं १ सप्टेंबरला कामावर गेली होती. तिचा फोन २ सप्टेंबरपासून बंद लागत होता. २१ सप्टेंबरला तिची आई आणि बहीण महालक्ष्मीच्या राहत्या घरी पोहचली तेव्हा हा सगळा प्रकार उघडकीस आला.
दरम्यान, आरोपीनं हत्येनंतर रक्ताचे डाग केमिकलने साफ केले आणि फरार झाले होते. फॉरेन्सिक लॅबमध्ये ही गोष्ट समोर आली. मात्र जेव्हा शेजारी आणि पोलीस घरात शिरले होते तेव्हा रक्ताचे डाग त्यांनी पाहिले होते.ज्यारितीने माझ्या बहिणीची हत्या करण्यात आली ते कुणा एका व्यक्तीचे काम नाही. स्कूटीवरून आलेले ते २ लोक ज्यांना शेजाऱ्यांनी पाहिले होते असं महालक्ष्मीचा भाऊ उक्कम सिंह याने सांगितले.