बंगळुरू - कर्नाटकची राजधानी बंगळुरू इथून ४ पाकिस्तानी नागरिकांना सोमवारी पोलिसांनी अटक केली. या चार पैकी २ महिला आहेत. बनावट कागदपत्रे, ओळखपत्रे दाखवून या चौघांनी भारतीय पासपोर्ट बनवला. चौघं गेल्या १० वर्षापासून धर्म प्रचाराचं काम करत होते. हे आरोपी स्वत:ला हिंदू म्हणवून घ्यायचे. २०१४ साली ते दिल्ली आले होते आणि २०१८ साली ते बंगळुरू येथे पोहचले. रविवारी बंगळुरुच्या बाहेरील भाग जिगानी येथील धाडीत या चौघांना पकडण्यात आले.
पोलिसांच्या माहितीनुसार, अटक केलेले चौघे पाकिस्तानचे असून त्यात कराची येथील राशिद अली सिद्धीकी उर्फ शंकर शर्मा, लाहौर येथील आयशा उर्फ आशा रानी, हनीम मोहम्मद उर्फ रामबाबू शर्मा, रुबीना उर्फ रानी शर्मा अशी यांची नावे आहेत. बंगळुरु पोलिसांनी या चौघांना कोर्टात हजर केले. ज्याठिकाणी १० दिवसांच्या पोलीस कोठडीत आरोपींना पाठवले. या चौघांव्यतिरिक्त आणखी कुणी साथीदार अथवा रॅकेट आहे का याचा पोलीस शोध घेत आहेत.
गुप्तचर यंत्रणाही करणार तपास
पाकिस्तानी नागरिकांना पकडल्यानंतर गुप्तचर यंत्रणाही जिगानी इथं दाखल झाले. आरोपींबाबत तपास यंत्रणा चौकशी करत आहेत. आरोपींवर पासपोर्ट अधिनियम १९६७ अंतर्गत कलम १२(१), १२(१एबी), १२(२) चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २९ सप्टेंबरला बंगळुरूच्या जिगानी पोलिसांना राजापुरा गावात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांबाबत माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत चौघांना अटक केली.
सर्व आरोपींची हिंदू नावाने पासपोर्ट
याआधी चेन्नई पोलिसांनी यांच्या २ नातेवाईकांना अटक केली होती. आरोपी राशिद अली सिद्दीकी उर्फ शंकर शर्मा आणि त्यांचे कुटुंबातील सदस्य घर खाली करत होते. पोलीस चौकशीत राशिदनं दावा केला की तो दिल्लीचा रहिवाशी आहे. मागील ६ वर्षापासून बंगळुरू इथे राहतो. चौकशीत पोलिसांना या चौघांकडून हिंदू नावांची पासपोर्टही आढळले. यांच्या घराची झडती घेतली तेव्हा भिंतीवर मेहंदी फाऊंडेशन इंटरनॅशनल जश्न ए यूनूस हे लिहिलेले निदर्शनास आले.
त्याशिवाय पोलिसांना त्यांच्या घरातून एका मुस्लीम धार्मिक नेत्याचा फोटो सापडला. चौकशीत हे लोक पाकिस्तानचे असून चेन्नईत अटक केलेले लोक त्यांचे नातेवाईक असल्याचं पुढे आले. आरोपी राशिद अली सिद्दिकी कराचीतील लियाकतबादचा रहिवासी आहे. तो त्याच्या पत्नीसह आई वडिलांसोबत मिळून हिंदू बनून भारतात राहत होता. २०११ साली आयशाशी सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलाखत झाली. लग्नावेळी तिचं कुटुंब बांगलादेशात राहायचे. पाकिस्तानी धार्मिक नेत्यांकडून छळ झाल्यानंतर तो पत्नीसह बांगलादेशात राहायला गेला होता. आरोपींना त्यांच्या खर्चासाठी मेहंदी फाऊंडेशनकडून पैसे मिळायचे. हे फाऊंडेशन भारतासह जगभरात सक्रीय आहे.