कोलकाता - बांग्लादेश खासदार अनवारूल अजीम अनार यांच्या हत्येबाबत नवनवीन खुलासे होत आहेत. खासदाराच्या हत्येत बालमित्राचा कट, ५ कोटी सुपारी आणि हनीट्रॅप अँगल समोर आला आहे. बांग्लादेशच्या पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतले आहे. या महिलेच्या माध्यमातून खासदाराला हनीट्रॅपमध्ये अडकवल्याचा आरोप आहे.
या महिलेचं नाव शिलांती रहमान असं आहे जी बांग्लादेशची नागरिक आहे. सूत्रांनुसार, शिलांती या हत्याकांडाचा मास्टरमाइंड अकतारुजमा शाहीनची प्रेयसी आहे. ज्यावेळी खासदार अनवारूल यांची हत्या झाली. तेव्हा ती कोलकाताला होती. १५ मे रोजी ती हत्याकांडातील मुख्य संशयित अमानुल्लाह अमान याला भेटण्यासाठी ढाका येथे पोहचली होती. अकतारूजमानं खासदाराला बांग्लादेशातून कोलकाता येथे बोलवण्यासाठी शिलांतीचा हनीट्रॅप म्हणून वापर केला होता.
पश्चिम बंगाल सीआयडीनं बांग्लादेशी खासदाराच्या हत्येत पहिली अटक केली आहे. जिहाद हवलदार नावाचा हा व्यक्ती आहे. जिहाद हा व्यवसायाने कसाई आहे. त्याला मास्टरमाइंड अकतारुजमाने मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी खास करून मुंबईहून बोलावलं होते. जिहादला २ महिन्याआधी या कामासाठी हायर केले होते. तो मुंबईहून कोलकाताला गेला. ५ कोटी सुपारीतील काही हिस्सा जिहादचा होता. तो कोलकाता एअरपोर्टजवळील एका हॉटेलमध्ये थांबला होता. खासदाराच्या बालमित्रानेच त्याच्या हत्येची सुपारी ५ कोटींना दिली होती. हा मित्र अमेरिकेचा नागरिक आहे.
बांग्लादेशी खासदार अनवारूल यांचा बालमित्र अकतारुजमा शाहीननं व्यावसायिक भांडणातून खासदाराची हत्या करण्याचं प्लॅनिंग केले. शाहीन हा झेनईदहचा राहणारा होता. त्याच्याकडे अमेरिकेचे नागरिकत्व आहे. त्याचा भाऊ झेनईदहच्या कोटचांदपूर महापालिकेचा महापौर आहे. शाहीन ३० एप्रिलला अमान आणि एका महिलेसोबत कोलकाताला आला होता. कोलकाताच्या सांजिबा गार्डनजवळ एक डुप्लेक्स फ्लॅट भाड्याने घेतला होता. शाहीन त्याचे २ सहकारी सियाम आणि जिहाद यांच्यासोबत आधीच कोलकातामध्ये आला होता. त्या तिघांनी मिळून खासदाराची हत्या केली.
कशी केली हत्या?
शाहीनला खासदार १२ मे रोजी कोलकाताला जाणार हे आधीच माहिती होते. खासदाराच्या हत्येसाठी धारदार शस्त्रांची खरेदी केली होती. खासदार अनवारूल हे कोलकाता येथे त्यांचा मित्र गोपाल विश्वासच्या घरी थांबले. त्यावेळी १३ मे रोजी हनीट्रॅपद्वारे खासदाराला गुन्हेगारांनी फ्लॅटवर बोलावले. अनवारूल संजिबा गार्डन जवळील फ्लॅटमध्ये गेले. तिथे प्लॅनिंगनुसार, खासदाराला पकडलं, त्यानंतर गळा दाबून हत्या केली. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे बनवले आणि वेगवेगळ्या ठिकाणी फेकून देणार होते. कोलकाता पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सहाय्याने या हत्याकांडाचा खुलासा केला.