विरार - मनसेच्या मोर्च्यानंतर बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांची पोलिसांकडून धरपकड सुरू झाली आहे. विरार येथील अर्नाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्य करणाऱ्या २३ बांगलादेशी महिला आणि पुरुषांना धडक कारवाई करून अटक करण्यात आली आहे.
अनैतिक मानवी वाहतूक, पालघर दहशतवाद विरोधी पथक आणि अर्नाळा पोलिसांनी संयुक्त कारवाई करून अर्नाळा, कळंब, राजोडी परिसरातून बुधवारच्या मध्यरात्री सापळा रचून ही कारवाई केली आहे. पकडलेल्या बांगलादेशींमध्ये १० महिला १२ पुरुष व एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. सर्व बांगलादेशी हे बेकायदेशीरपणे राहून भंगार आणि मोलमजुरीचे काम करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याबाबत अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून २३ बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे.