लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: गुन्हे शाखेने करावे गावात छापा टाकून चार बांगलादेशींनाअटक केली. यामध्ये तीन महिला व एका पुरुषाचा समावेश आहे. बेनापोल बोनगा सीमेवरून भारतात घुसखोरी करून जवळपास २० वर्षांपासून ते नवी मुंबई व इतर ठिकाणी वास्तव्य करत होते. त्यांच्याकडे आधार व पॅन कार्ड आढळून आले असून, मोबाइलवरून बांगलादेशमधील नातेवाइकांच्या संपर्कात असल्याचेही तपासात उघड झाले आहे.
रुकसाना नुरुल इस्लाम शेख (३७), उंजिल खातून परवेल शेख (२७), पिंकी तारीख शेख (२७), रॉनी नुरुल इस्लाम शेख (३०) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. चौघेही करावेगाव सेक्टर ३६ मध्ये वास्तव्य करत होते. मूळचे बांगलादेशमधील जोशोर, नोडाईल, खुल्ना जिल्ह्यातील रहिवासी असून, त्यांच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड व मोबाइल फोन आढळला. त्यांच्या मोबाइलमध्ये ईमो नावाचे ॲप्लिकेशन आढळले. त्यामध्ये फोन नंबरवर कॉल व बांगलादेशी भाषेत चॅटिंग केल्याचेही आढळले आहे. व्हॉट्सॲपमध्येही बांगलादेशमधील नंबर आढळले असून, त्यांच्याबरोबर संपर्कात असल्याचे निदर्शनास आले आहे.
कोणी कधी केली घुसखोरी?
- नुरूल शेख : २००३-०४ मध्ये बेनापोल बोनगा सीमेवरून भारतामध्ये घुसखोरी. २०११ मध्ये बांगलादेशात जाऊन पुन्हा भारतामध्ये आली. मोबाइलवरून बांगलादेशमधील नातेवाइकांशी नियमित संपर्क.
- उंजिला शेख : २०१२ मध्ये पासपोर्ट काढून भारतामध्ये आली. पुन्हा गावी गेली नाही.
- रॉनी शेख : २००३-०४ मध्ये बेनापोल बोनगा सीमेवरून भारतामध्ये घुसखोरी. २०११ मध्ये बांगलादेशमध्ये जाऊन पुन्हा भारतामध्ये आली.
- पिंकी शेख : २००५-०६ मध्ये बेनापोल बोनगा सीमेवरून घुसखोरी. २०१० मध्ये पुन्हा बांगलादेशला जाऊन भारतामध्ये परत आली.