लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई/भिवंडी : घुसखोर बांगलादेशींना बनावट कागदपत्रांच्या आधारे अवघ्या ८ हजारात रेशनकार्ड बनवून देणाऱ्या टोळीचा महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाच्या (एटीएस) ठाणे युनिटने पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी भिवंडीतून इरफान अली अन्सारी, संजय बोध आणि नौशाद राय अहमद शेख या तिघांना अटक करण्यात आली आहे.
भिवंडी परिसरात बनावट रेशनकार्ड बनविणारी टोळी कार्यरत असल्याची माहिती एटीएसला मिळाली. त्यानुसार, पथकाने बनाव करत टोळीला आपल्या जाळ्यात ओढले. त्यांच्याकडून बनावट रेशनकार्डची मागणी केली. त्यांनी ८ हजारात रेशनकार्ड देण्याची तयारी दर्शवताच पथकाने सापळा रचून तिघांवर कारवाई केली आहे. बनावट कागदपत्रांचा वापर करून बांगलादेशातील नागरिकांना रेशनकार्ड बनवल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली आहे. नौशाद हा रेशन दुकान चालवतो. अन्य दोघांच्या मदतीने बनावट कागदपत्रे बनवून नागरिकांना बनावट रेशन कार्ड मिळवून देण्यात मदत केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी या प्रकरणात निजामपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास व कारवाईसाठी तिन्ही आरोपींना स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यांनी आतापर्यंत शेकडो लोकांना अशाप्रकारे रेशनकार्ड बनवून दिल्याचा संशय असून त्यानुसार अधिक तपास सुरू आहे. यामध्ये कुणाचा संबंध आहे का, याबाबत पोलिस त्रिकुटाकडे चौकशी करत आहे.
बाेगस कागदपत्रे जप्त
बनावट शिधावाटप पत्रिका बनवून अवघ्या आठ हजार रुपयांत विक्री करणारे मोठे रॅकेट भिवंडीत कार्यरत हाेते. यात एका शिधावाटप दुकानदाराचादेखील सहभाग आहे. भिवंडीत बनावट कागदपत्रांच्या आधारे शिधावाटप पत्रिका बनवून दिली जात असल्याची माहिती ठाणे येथील दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे निजामपूर पोलिस ठाणे हद्दीत लबेला ज्यूस सेंटर हसीन सिनेमा येथे सापळा रचून पथकाने कारवाई केली. त्याठिकाणाहून अनेक रेशनकार्डसंबंधित बनावट कागदपत्रेही जप्त केली आहेत.