नवी दिल्ली - भाजप खासदार साक्षी महाराज (BJP MP Sakshi Maharaj ) हे आपल्या वादग्रस्त विधानांसाठी लोकप्रिय आहे. मात्र आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. त्यांची मोठी फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. साक्षी महाराज यांच्या बँक खात्यातून आरोपींनी रक्कम काढल्याची घटना घडली आहे. दोन बनावट चेकद्वारे त्यांनी खासदारांच्या बँक खात्यातून तब्बल 97 हजार 500 रुपये काढून घेतले आहेत. नवी दिल्लीचे पोलीस उपअधीक्षक दीपक यादव यांनी याबाबत माहिती दिली. पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी निहाल सिंह आणि दिनेश राय नावाच्या आरोपींना बिहारमधून अटक करण्यात आली आहे. एक हजाराहून अधिक लोकांच्या बँक खात्यातून कोट्यवधी रुपये काढून घेतल्याचे आरोपींनी चौकशी दरम्यान कबूल केले आहे. खासदार साक्षी महाराज यांनी या प्रकरणी संसद मार्ग पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली होती. कोणीतरी त्यांच्या एसबीआय बँक खात्यातून दोन बनावट धनादेशासह 97,500 रुपये काढून घेतल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले होते.
खासदारांनी आपल्या तक्रारीत ज्या चेकमधून पैसे काढले गेले आहेत तेच चेक त्यांच्याकडे आहेत असं देखील म्हटलं आहे. पोलिसांनी एसबीआय बँकेतून माहिती काढली असता, आरोपींनी खासदार साक्षी महाराज यांच्या बँक खात्याला तीन बनावट चेक लावले होते. निहाल याला दिनेश राय बनावट चेक देत असत. हे चेक वेगवेगळ्या बँकांमध्ये जमा करून ते पैसे काढायले. या कामासाठी त्याला फसवणूक झालेल्या रकमेच्या 30 टक्के कमिशन मिळायचे. दिनेश राय यांनी चौकशी दरम्यान दिलेल्या माहितीनुसार, तो बनावट चेक छापत असायचा आणि त्यानंतर तो बँकांमध्ये जमा करायचा.
पोलीस आता दिनेश रायची अधिक चौकशी करत आहेत. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आरोपी बँकांमध्ये 50 हजारांपेक्षा कमी चेक लावत असत. 50 हजार आणि त्याहून अधिकचा चेक लावल्यास बँक संबंधित ग्राहकाला माहिती देते. हे आरोपी देशभरात बनावट चेकने फसवणूक करत आहेत. तसेच यामध्ये बँक कर्मचाऱ्यांचा देखील समावेश असल्याचा पोलिसांना संशय आहे. कारण बँक कर्मचारी चेक नंबर, खाते क्रमांक आणि सही बाबत माहिती पुरवत असतील असं पोलिसांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.