पुणे : डॉरमंट (निष्क्रिय) खात्याचा गोपनीय डेटा मिळवून त्याची विक्री करून त्याद्वारे कोट्यवधी रुपये कमविण्याच्या या कटाचे मास्टर माइंड सुरतचा वरुण वर्मा आणि पुण्याची अनघा मोडक हे दोघे असल्याचे आतापर्यंतच्या पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान, औरंगाबादचे राजेश शर्मा आणि परमजितसिंग संधू तसेच अनघा अनिल मोडक (४०, रा. वडगाव) यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना गुरुवारी न्यायालयात हजर करणार आहेत.सायबर पोलिसांनी काल ८ जणांना अटक केली होती. त्यांच्यातील आणखी तिघांना आज अटक केली आहे. आरोपींच्या ताब्यातून जप्त केलेला डेटा हा त्यांनी गुजरात, सुरत व हैदराबाद येथून मिळविल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून गुन्हे शाखेची पथके तिकडे रवाना झाली आहेत.
२५ लाखांत व्यवहार करण्यासाठी आले, आणि... -
डेटा विकत घेऊन हॅकर्सच्या मदतीने खात्यातील पैसे मिळविण्यासाठी अनघा अशा काही हॅकर्सच्या संपर्कात होती. त्यातूनच तिची औरंगाबादच्या विशाल बेंद्रेशी ओळख झाली. तो प्लॉटिंगचा व्यवसाय करतो. त्याच्या मार्फत राजेश शर्मा आणि परमजितसिंग संधू यांच्याशी संपर्क झाला. डेटाच्या माध्यमातून मिळणाऱ्या पैशांपैकी काही पैसे औरंगाबाद येथील राजेश शर्मा आणि परमजित संधू या दोघांना हवे होते. त्यासाठी अनघा त्यांच्याकडे अडीच कोटींची मागणी करत होती. मात्र त्यांच्याकडे एवढे पैसे नसल्यामुळे २५ लाखांत त्यांना तो व्यवहार करून हवा होता. पैसे घेऊन शर्मा व संधू दोघे पुण्यात आले होते. पोलिसांनी सिंहगड रोडवरील भटेवरा याच्या घरासमोर यातील सर्वांना पकडले. तेव्हा इतरांबरोबरच शर्मा आणि संधू हेही होते. त्यांच्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर पोलिसांनी त्यांना आज अटक केली.
राजेश शर्मा आणि परमजितसिंग संधू हे दोघेही सध्या आर्थिक अडचणीत सापडले होते. न्यूज चॅनेल बंद पडल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. झटपट पैसे मिळविण्याच्या नादात त्यांचा अनघाशी संपर्क झाला होता. तिच्याकडून डेटा घेऊन ते औरंगाबादमधील एकाला पुढे विकणार होते. तसेच हॅकर्सच्या मदतीने या खात्यांमधील पैसा काढून घेण्याचा त्यांचा कट होता.
या आरोपींकडे मिळालेला २१६ कोटी रुपयांचा डेटा हा केवळ ५ खात्यांशी संबंधित आहे. त्यातील एक खाते सक्रियही आहे. आणखी काही सूत्रधार असून त्यांना ताब्यात घेतल्यानंतर हा सर्व प्रकार अधिक सुस्पष्ट होईल. यात काही बँकेशी संबंधितांचाही हात असण्याची शक्यता आहे.- भाग्यश्री नवटके, पोलीस उपायुक्त
अनघाला हवे होते अडीच कोटी पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी सांगितले की, अनघा मोडक ही शेअर ब्रोकर म्हणून व्यवसाय करत होती. मात्र, तिचा व्यवसाय बंद पडला होता. एकमेकांच्या माध्यमातून या सर्वांचा परिचय झाल्याचे ते सांगत आहेत. वरुण याने हा सर्व डेटा मिळवून दिला आहे. या डेटाचा वापर करुन बँक खातेदारांच्या खात्यावरील पैसे काढून देण्याची जबाबदारी अनघा हिने घेतली होती. तसेच ती हा डेटा विकत घेणाऱ्यांचा शोध घेत होती. तिला काही जण तसेच भेटलेही होते. मात्र, तिला त्यातून अडीच कोटी रुपये हवे होते.