नवी दिल्ली : शक्ती भोग फूड लिमिटेड कंपनीचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) केवल कृष्ण कुमार यांना कोट्यवधी रुपयांच्या बँक घोटाळ्यात अटक करण्यात आली आहे. कर्जाची रक्कम मनी लाँड्रिंग करून अन्यत्र वळविल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. कुमार यांना विशेष पीएमएलए न्यायालयाने ९ जुलैपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. कुमार यांना अटक करण्यापूर्वी ईडीने दिल्ली आणि हरियाणातील किमान नऊ ठिकाणी छापे मारले होते.
या छाप्यांमध्ये विविध कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे ईडीच्या हाती लागले आहेत, असे ईडीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. शक्ती भोग फुड्सने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) नेतृत्वाखालील १० बँकांच्या समूहाचे ३,२६९ कोटी रुपयांचे कर्ज बुडवले आहे. याप्रकरणी सीबीआयने एफआयआर दाखल केलेला आहे. त्याचा तपास ईडी करीत आहे. याप्रकरणी कुमार यांच्या विरोधात विविध कलमांखाली गुन्हे दाखल आहेत. मनी लाँड्रिंग प्रकरणाचा तपास गेल्या काही दिवसांपासून सुरू होता. त्यामध्ये पुरेसे पुरावे हाती लागल्यानंतर अटक करण्यात आली.