बीड: हात उसणे घेतलेल्या रकमेपाेटी दिलेला साडेसात लाखांचा धनादेश वटला नाही. या प्रकरणी बीड शहरातील एका बिअरबार मालकास दोन वर्षाची शिक्षा जिल्हा न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन.ए. इंगळे यांनी सुनावली. शहाजी संतपराव वरवट असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. बीड येथील अर्चना अशाेक तावरे या एका इंग्रजी शाळेवर शिक्षका आहे. आरोपी शहाजी वरवट हा विक्रम हॉटेल बिअर बार व परमिटरूमचा चालक आहे. आरोपी व फिर्यादी हे नातेवाईक आहेत.
अर्चना अशोक तावरे यांचे सासरे शिवाजी माधव तावरे यांनी त्यांची जमीन विकली होती. हीबाब माहित असल्याने आरोपी वरवट याने व्यावसाय व घरगुती अडचण सोडविण्यासाठी अर्चना तावरे यांच्याकडे ७ लाख ५० हजार रुपयांची मागणी केली. मागचा व्यवहार व नाते संबंधाचा विचार करुन अर्चना यांनी वरवट यास ७ लाख ५० हजार रुपये हात उसणे दिले. ही रक्कम एक वर्षाच्या आत देण्याचे तोंडी आश्वासन दिले.
दरम्यान, घरगुती अडचण आल्याने अर्चना तावरे यांनी आरोपी वरवट याच्याकडे हात उसणे दिलेल्या पैशांची मागणी केली. ऐवढी मोठी रोख रक्कम उपलब्ध नसल्याचे सांगत त्यांना बीड येथील उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचा २३ मार्च २०१७ रोजीचा धनादेश लिहून दिला. अर्चना तावरे यांनी सदरील धनादेश दिलेल्या तारखेस वटवण्यास सदरील बँकेत टाकला असता खात्यात पुरेशी रक्कम नाही या शेऱ्यासह तो धनादेश न वटता परत आला. त्यामुळे तावरे यांनी आरोपीस कायदेशीर नोटीस पाठवली. नोटीस आरोपीस मिळून देखील वरवट याने वेळेत रक्कम परत केली नाही. त्यामुळे तावरे यांनी जिल्हा न्यायालयात प्रकरण दाखल केले.
या प्रकरणी ॲड. सागर नाईकवाडे यांनी केलेला युक्तीवाद गृह्यधरुन प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन.ए. इंगळे यांनी आरोपी शहाजी संतपराव वरवट यास दोन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच ९ टक्क्या प्रमाणे १५ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेशित केले. फिर्यादीच्यावतीने ॲड. सागर नाईकवाडे यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. राजेश जाधव, ॲड. सुधीर जाधव, ॲड. सतिष गाडे, ॲड. विवेक गाडे यांचे सहकार्य लाभले.