मुंबई - चेंबूर येथील एका बारमध्ये मोबाइलने शुटींग केल्याप्रकरणी ग्राहकाला बार मालक आणि कर्मचाऱ्यांनी नग्न करून मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. बार मालक इतक्यावरच न थांबता तो व्हिडीओ सोशल मिडियावर वायरल केला. या प्रकरणी चेंबूरपोलिसांनी बारचा मालक, बार चालवणाऱा आणि कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
गोवंडी परिसरात राहणारा 45 वर्षीय तक्रारदार हा एका प्रसिद्ध तमाशात ढोलकी वाजवतो. तक्रारदाराला दारूचे व्यसन असल्याने तो दररोज चेंबूरच्या राम पंजाब बारमध्ये मद्यप्राशनासाठी जायचा. 16 फेब्रुवारी रोजी तक्रारदार हा बारमध्ये मद्यप्राशन करत असताना त्याने त्याच्या मोबाईलवरून बारमधला प्रकार आपल्या मोबाईलमध्ये टिपला. ही बाब बारमधील मॅनेजरला कळाल्यानंतर मॅनेजर आणि कर्मचाऱ्यांनी त्याला मारहाण करत त्याचा मोबाईल काढून घेतला. दुसऱ्या दिवशी म्हणजे 17 फेब्रुवारी रोजी तक्रारदार त्याचा मोबाइल घेण्यासाठी सायंकाळी बारमध्ये गेला. त्यावेळी बार मॅनेजर जगदीश शेट्टी, बार चालविणारा सुखदेव पाटील आणि बारमध्ये काम करणारा अब्दुल अजीज याने त्याला मारहाण केली. तसेच तक्रारदाराच्या अंगावरील कपडे काढून त्याचा नग्न अवस्थेतला व्हिडीओ मोबाईलमध्ये टिपला. या घटनेची माहिती तक्रारदाराने त्याच्या घरचे आणि मित्रांना दिल्यानंतर या प्रकरणी तक्रारदाराने 20 फेब्रुवारी रोजी चेंबूर पोलीस ठाण्यात या तिघांविरोधात भा. दं. वि. कलम 394, 341, 355, 504, 506, 34 माहिती व तंत्रज्ञान कायदाअन्वये गुन्हा दाखल केला. दरम्यान, चेंबूर पोलिसांनी यातील बार कर्मचारी अब्दुल अजीज याला अटक केली असून इतर दोन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.