मध्य प्रदेशातील राजगडमध्ये पोलिसांनी कुख्यात टोळीच्या चार वॉन्टेड गुन्हेगारांना त्यांच्याच लग्नात अटक केल्याची घटना समोर आली आहे. देशभरात दरोडे आणि चोरीच्या घटनांमध्ये सहभागी असलेली ही टोळी अनेक वर्षांपासून पोलिसांना चकवा देत होती. हे लोक विविध राज्यांमध्ये लग्न समारंभात मौल्यवान वस्तू चोरायचे आणि पळ काढायचे.
टोळीतील चार जणांना पकडण्यासाठी मध्य प्रदेश पोलिसांनी त्यांच्याच लग्नात असा सापळा रचला की, ते सुटू शकले नाहीत. कडिया गाव हे गुन्हेगारांचा गड मानला जातो. पोलीस अधीक्षक आदित्य मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नासाठी त्यांच्या मूळ गावी कडिया येथे परतलेल्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी मोठं प्लॅनिंग करण्यात आलं होतं.
मिश्रा म्हणाले की, कडिया गावात आणि आसपास १७ वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमधील एकूण १५३ कर्मचारी तैनात करण्यात आले होते. तैनात असलेल्या दलाला मदत करण्यासाठी अधिकाऱ्यांनी टेंट, मोबाईल टॉयलेट आणि पाण्याचे टँकर असलेली पूर्णपणे सुसज्ज पोलीस छावणी देखील उभारली होती. सशस्त्र पोलीस दल तैनात करण्यात आलं होतं.
अटकेदरम्यान गुन्हेगार गर्दीतून गायब होण्याचा प्रयत्न करू नये म्हणून काही कर्मचाऱ्यांना साध्या वेशातही ठेवण्यात आलं होतं. लोकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी आणि ओळख पटवण्यास मदत करण्यासाठी पोलिसांनी गावात या वॉन्टेड गुन्हेगारांच्या फोटो असलेले बॅनर लावले होते. त्यापैकी अनेकांवर अनेक राज्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत.
लग्नाच्या विधी पूर्ण झाल्यानंतर लगेचच पोलिसांनी चारही गुन्हेगारांना अटक करण्यात यश आलं. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, अटक केलेल्या गुन्हेगारांमध्ये कबीर सांसी (२४) यांचा समावेश आहे, ज्यांच्यावर मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि उत्तर प्रदेशात १६ गुन्हे दाखल आहेत. याशिवाय ऋषी सांसी (१९) याच्यावर हरसूद, खंडवा, रेवा, नीमच आणि राजगड (मध्य प्रदेश) तसेच झालावाड (राजस्थान) जिल्ह्यात १३ गुन्हे दाखल आहेत. आणखी एक आरोपी मोहनीश सांसी याच्यावर छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये ३२ गुन्हे दाखल आहेत, तर रोहन सांसी याच्यावर चार गुन्हेगारी गुन्हे दाखल आहेत.