उत्तर प्रदेशातील बाराबंकीमध्ये ट्रिपल तलाकची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका व्यक्तीने आपल्या शिक्षिका असलेल्या पत्नीला शाळेच्या आत शिरून वर्गातील विद्यार्थ्यांसमोर ट्रिपल तलाक दिला आहे. त्यानंतर शिक्षिकेने पतीसह चौघांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
शिक्षिकेने दिलेल्या माहितीनुसार, शाळेत मुलांना शिकवत असताना पतीने तिला तलाक दिला. ती वर्गात हजर होती. मुलांना शिकवत होती. तेवढ्यात तिचा नवरा वर्गात आला. त्याने तिच्यासमोर तीन वेळा तलाक तलाक तलाक असं म्हटलं आणि निघून गेला. हे प्रकरण बाराबंकीच्या बेगमगंज भागात घडलं आहे.
तमन्नाने सांगितले की, 2020 मध्ये फिरोजाबाद जिल्ह्यातील करीमगंज येथे राहणाऱ्या शकीलसोबत तिचा निकाह झाला होता. ती सासरच्या घरी आली असता तिच्याकडे दोन लाख रुपयांच्या हुंड्याची मागणी करण्यात आली. शिक्षिकेने हुंडा देऊ शकत नसल्याचे सांगताच तिला घरातून हाकलून दिलं. त्यानंतर ती तिच्या माहेरी आली.
काही दिवसांनी तिचा नवरा तिला न सांगता सौदी अरेबियाला गेला. शिक्षिकेला हा प्रकार कळताच तिने फिरोजाबाद येथील सासरचे घर गाठलं. मात्र सासरच्यांनी तिला घरात येऊ दिलं नाही. पुन्हा ती तिच्या माहेरच्या घरी परतली आणि इथल्या शाळेत शिकवू लागली. त्यानंतर अचानक ऑगस्ट महिन्यात तिचा नवरा सौदी अरेबियातून फिरोजाबादला परत आला.
परतल्यानंतर तो तिला फोनवरून तलाकची धमकी देऊ लागला. त्यानंतर ती शाळेत शिकवत असताना अचानक तो वर्गात घुसला. सर्व मुलांसमोर ट्रिपल तलाक देऊन निघून गेला. बिनू सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण प्रकरणात पीडितेने पती शकील, पहिल्या पत्नीची दोन मुलं आणि सासू यांच्या विरोधात हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.