बारा: राजस्थानच्या बारा जिल्ह्यातील देवरीमध्ये वास्तव्यास असलेल्या एका खासगी डॉक्टरच्या घरात स्फोट झाला आहे. ढिगाऱ्याखाली अडकून डॉक्टरांचा मृत्यू झाला. डॉक्टरांची पत्नी आणि एक शिक्षिका स्फोटात गंभीर जखमी झाली आहे. शिक्षिका डॉक्टरांकडे भाड्यानं राहत होती. डॉक्टरांची पत्नी आणि शिक्षिकेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या घरात असलेल्या जिलेटिनच्या काड्यांचा स्फोट झाल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आली आहे. डॉक्टरांनी त्यांच्या घरात जिलेटिनच्या काड्या का ठेवल्या होत्या, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.
रविवारी रात्री २ च्या सुमारास डॉक्टरांच्या घरात स्फोट झाला. स्फोटात डॉ. एम. एल. धाकड यांचा मृत्यू झाला. धाकड मूळचे मध्य प्रदेशच्या मुरैना जिल्ह्याचे रहिवासी होते. मात्र गेल्या १५ वर्षांपासून ते देवरीत वास्तव्याला होते. त्यांच्या घरात स्फोटक ठेवण्यात आलं होतं. रविवारी रात्री डॉक्टर आणि त्यांच्या पत्नी घरात होती. भाडेकरू महिला तिच्या खोलीत होती.
मध्यरात्रीच्या सुमारास घरात स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता जास्त असल्यानं डॉक्टरांचं घर कोसळलं. ढिगाऱ्याखाली आल्यानं डॉक्टरांचा मृत्यू झाला. त्यांची पत्नी, भाडेकरू महिला गंभीर जखमी झाल्या. स्फोटाचा आवाज ऐकून ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केलं आणि घटनेची माहिती पोलिसांना दिली.
जखमींवर स्थानिक रुग्णालयात प्राथमिक उपचार झाले. प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना पुढील उपचारांसाठी बारा हायर सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. स्फोट झालेल्या घराची त्यांनी पाहणी केली. डॉक्टरांनी त्यांच्या घरी स्फोटकं का ठेवली होती, याचा तपास पोलीस करत आहेत. स्फोटक ठेवण्यामागे काय हेतू होता, डॉक्टर जिलेटिनच्या काड्या कशासाठी वापरणार होते, या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न डॉक्टरांकडून सुरू आहे.