ठाणे : अंबरनाथमध्ये बदलापूर रोड भागात काही महिलांकडून सेक्स रॅकेट चालविणाऱ्या सोनू काझी (४०, रा. उल्हासनगर, ठाणे) याच्यासह दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केल्याची माहिती पोलिसांनी बुधवारी दिली. त्यांच्या तावडीतून अवघ्या पाच हजारांमध्ये सौदा केलेल्या पीडित महिलेची सुटका करण्यात आली आहे.
अंबरनाथमधील बदलापूर रोड भागातील रिलायन्स मार्केट परिसरात दोघे दलाल हे काही महिलांकडून शरीरविक्रय व्यवसाय करून घेत असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्याच आधारे पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश पाटील, जमादार श्रद्धा कदम, डी. व्ही. चव्हाण, डी. के. वालगुडे, हवालदार पी. ए. दिवाळे, अंमलदार आर. व्ही. कदम, व्ही. बी. यादव आणि के. डी. लादे आदींच्या पथकाने १० जानेवारीला सायंकाळी ५.३० ते ६ च्या सुमारास अंबरनाथच्या बदलापूर रोड भागात सापळा लावला. त्यावेळी पोलिसांनी बनावट गिऱ्हाईकाच्या माध्यमातून सोनू या दलालाला गाठले. त्याने पाच हजारांमध्ये महिलेचा सौदा केला. ही २५ वर्षीय महिला तिथे आल्यानंतर तिला यातील तीन हजार रुपये देण्यात आले, तर एक हजार रुपये सोनूने स्वत:कडे ठेवून उर्वरित एक हजार रुपये गगन शर्मा या त्याच्या साथीदार रिक्षा चालकाला दिले.
बनावट गिऱ्हाईक पाठविले
या बनावट गिऱ्हाईकाने इशारा केल्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याठिकाणी छापा टाकून सोनू आणि गगन शर्मा या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध पिटा कायद्यानुसार अंबरनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या दोघांनाही अंबरनाथ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पोलिस निरीक्षक जनार्दन सोनवणे तपास करीत आहेत.