बाडमेर – राजस्थानच्या चौहटाना परिसरात एका युवकाला काही लोकांनी घराच्या बाहेरील झाडाला बांधून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला. व्हिडीओची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ पोलीस अधीक्षकांनी चौहटाना पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
चौहटाना पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल गोपाळ यांनी सांगितले की, मंगळवारी दुपारी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात काही लोक युवकाला झाडाला बांधून जबरदस्तीनं त्याचे मुंडन करण्याचा प्रयत्न आणि मारहाण केली. या व्हिडीओची पडताळणी केली असता युवक बाखासर परिसरातील असल्याचं आढळलं. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना माहिती मिळाली की, हा युवक २५ जुलैच्या रात्री कोनरा गावात आला होता. त्याठिकाणी त्याला अमानुषपणे मारहाण करण्यात आली. व्हिडीओच्या आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
काय आहे या व्हिडीओ?
व्हायरल व्हिडीओत एका युवकाचे हातपाय झाडाला बांधून जबरदस्तीनं त्याचे मुंडन करण्यात आले. त्यानंतर युवकाला दारुच्या बाटलीतून मूत्र पाजले, ही घटना तीन-चार दिवसापूर्वीची आहे. युवकासोबत झालेला अमानुष अत्याचार कोणीतरी व्हिडीओत कैद केला. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर घडलेला प्रकार उघडकीस आला.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित घटनेची चौकशी करण्यासाठी पोलीस घटनास्थळी पोहचले. पण पीडिताच्या बाजूने साक्ष देण्यासाठी कोणीही पुढे आलं नाही. सदरील प्रकरण ग्रामस्थांनी दोन्ही बाजूंशी चर्चा करुन सोडवलं होतं, दोन्ही बाजूने तडजोड झाल्यामुळे कोणीही या घटनेची वाच्यता केली नाही. त्यानंतर पोलिसांनी पीडिताशी संपर्क साधून गुन्हा दाखल करण्यास सांगितले पण त्यानेही नकार दिला. त्यामुळे व्हायरल व्हिडीओच्या आधारे पोलिसांनी स्वत:हून गुन्हा दाखल करुन घेतला आहे. याबाबत पीडिताची आरोग्य तपासणी करण्यात येईल, ही घटना का घडली याचा शोध घेतला जाईल, त्यानंतर दोषींवर योग्य ती कठोर कारवाई करण्यात येईल असा विश्वास बाडमेरचे पोलीस अधीक्षक आनंद शर्मा यांनी व्यक्त केला आहे. तसेच लवकरच आरोपींना ताब्यात घेऊ असंही ते म्हणाले.