चंढीगड - पंजाबमधील एका अकाऊंट कर्मचाऱ्याने त्याच्या व्यापारी बॉसला मिठाईच्या डब्ब्यातून बंदूक पाठवली होती. तसेच वारंवार खंडणीची मागणीही केली होती. याप्रकरणी टिंबर व्यापारी राजंदर सिंग यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी भारत भूषण आणि त्याचे मित्र राजवीरसिंग उर्फ राजू व सुनिल यांना अटक केली आहे.
राजंदर सिंग हे टिंबर व्यापारी असून ते चंढीगडमधील जगधारी येथे राहातात. तर भारत भूषण हा त्यांच्याकडे अकाऊंटंट म्हणून कार्यरत होता. सन 2010 ते 2015 या कालावधीत भारत भूषण याने राजंदर सिंग यांच्याकडे अकाऊंटंट म्हणून काम पाहिले. पण, त्याने मालकाकडे 8 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. त्यानंतर राजंदर सिंग यांनी त्यास कामावरुन निघून जाण्यास सांगितले. तरीही, भूषणकडून व्यापारी सिंग यांना खंडणीसाठी धमकी देणे सुरूच होते. त्याचाच, एक भाग म्हणून 19 नोव्हेंबर रोजी भूषणने एका मिठाईच्या डब्ब्यात सिंग यांना गावठी पिस्तूल भेट पाठवले. त्यानंतर, 47 वर्षीय सिंग यांनी पोलिसांकडे तक्रार केली. सिंग यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तपास सुरू करत आरोपींना अटक केल्याचे पोलीस अधिकारी राकेश कुमार यांनी सांगितले.