मुंबई - अज्ञात व्यक्तींनी पाठवलेल्या ऑनलाईन लिंकवर क्लिक करणे टाळा. कारण बोरिवलीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बोरीवली येथील रहिवासी असलेल्या प्राचार्य असलेल्या ६४ वर्षीय महिलेच्या बँक खात्यावरून अशाच पद्धतीने सायबर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. विशेष म्हणजे तक्रारदार महिलेने कोणतीही माहिती आरोपीला दिली नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे.याप्रकरणी दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
६४ वर्षीय तक्रारदार महिला बोरीवली पूर्व येथील रहिवासी असून मालाड येथील महाविद्यालयात प्राचार्य म्हणून काम करतात. त्याचे महाविद्यालयाजवळील एका खासगी बँकेत बचत खाते आहे. ४ जानेवारीला ते महाविद्यालायात काम करत असताना त्यांना अनोळखी व्यक्तीचा दूरध्वनी आला.दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने आपण बँकेतून बोलत असल्याचे सांगितले. तुमच्या बँक खात्याचे केवायसी करायचा असल्यामुळे तुम्हाला बँक खात्याची माहिती द्यावी लागेल अशी माहिती दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने केली.त्यावेळी तक्रारदार महिलेने नकार देऊन आपण बँक स्वतः जाऊन सर्व प्रक्रिया करू, असे सांगितले. त्यावर दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने तुम्हाला बँकेत जाण्याची गरज नसून एक लिंक पाठवत आहे. त्यात माहिती अपलोड केली असता सर्व प्रक्रिया पूर्ण होईल, असेही त्याने तक्रारदार महिलेला सांगितले.त्यानंतर तक्रारदार महिलेने ती लिंक क्लीक केली असता ओपन झाली नाही. त्यानंतर पाच मिनिटातच त्यांच्या खात्यावरून ४९ हजार, ४९ हजार व १८ हजार असे एकूण एक लाख १७ हजार रुपये डेबिट झाले. त्यांनी पुन्हा त्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधला असता तो बंद आढळला.त्या तात्काळ बँकेत गेल्या असता त्यांची फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. अखेर याप्रकरणी त्यांनी दिंडोशी पोलिसांकडे तक्रार केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.