वसई - नालासोपारा शहरातील बोगस डॉक्टारांविरोधात पालिकेच्या आरोग्य विभागाने जोरदार मोहीम हाती घेतली आहे. नालासोपारा येथून ६ बोगस डॉक्टरांना अटक करण्यात आलेली आहे. त्यापैकी एक डॉक्टर पळून जाण्यात यशस्वी ठरला आहे. या डॉक्टरांकडे कुठल्याच प्रकारचे शिक्षण नव्हचे आणि बंदी असलेले, हानीकारक औषधे ते रुग्णांना देत असल्याचे आढळून आले. कारवाईचदरम्यान एक बोगस डॉक्टर पळून जाण्यात य़शस्वी ठरला.
गेल्या काही महिन्यांपासून पालिकेची बोगस डॉक्टरांविरोधातील मोहीम थंडावली होती. त्यामुळे अनेक बोगस डॉक्टरांनी आपापले दवाखाने थाटले होते. वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी महाराष्ट्र मेडीकल काऊंसिलची परवागनी आवश्यक असते. मात्र, कुठल्याही परवानगी आणि नोंदणीशिवाय हे डॉक्टर व्यवसाय करत असतात. गुरूवारी पालिकेच्या आरोग्य विभागाने नालासोपारा येथे डॉक्टरांच्या दवाखान्यात जाऊन तपासणी केली. त्यावेळी ६ बोगस डॉक्टर आढळून आले. संजकुमार सिंग, सभजीत गौतम, दुधनाथ यादव, मनोज गुप्ता, कृष्णचंद्र पाल आणि रामजित पाल अशी नालासोपारा येथे कारवाई करण्यात आलेल्या बोगस डॉक्टरांची नावे आहेत. यापैकी एक डॉक्टर पथकाच्या हातावर तुरी देऊन पळून जाण्यात य़शस्वी ठरला.
पालिकेच्या आरोग्य विभागातील पथकाने छापा टाकल्यानंतर या रुग्णांचा जीवावर उठलेल्या डॉक्टरांचे प्रताप पाहून धक्का बसला. या डॉक्टरांकेड कुठल्याच प्रकारची पदवी नव्हती. त्यांचे शिक्षणही पूर्ण झालेले नव्हते. बंदी असलेली औषधे, रुग्णाच्या जिवितास धोका निर्माण कऱणारी इंजेक्शनं या डॉक्टरांच्या दुकानात आढळून आली. भूल देण्याची, सुन्न कऱणारी घातक औषधे दुकानात होती. या लोकांचा डॉक्टरकीच्या शिक्षणाचाही काही संबंध नव्हता. तरी ते अॅलोपॅथी प्रॅक्टीस करत रुग्णांच्या जीवाशी खेळ करत होते, असे पालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेंद्र चौहान यांनी सांगितले. या डॉक्टरांविरोधात अशीच कारवाई यापुढेही सुरू राहील अशी माहिती चौहान यांनी दिली. या सहा बोगस डॉक्टरांविरुद्ध तुळींज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात येत आहे.