खोपोली - भुकेलेल्याला खाऊ घालण्यासाठी आपली परिस्थिती गरीब असतानाही एका महिलेला दोघांना वडापाव खायला दिला. मात्र, आपल्याला खायला देणाऱ्या महिलेला त्यांनी बोलण्यात गुंतवून भुल दिली व तिचे दागिने लुटले. हा धक्कादायक प्रकार खोपोली येथे घडला आहे. तिच्या चांगूलपणाचा गैरफायदा घेणारे भामटे पळून गेले. ही घटना मोगलवाडी येथे रविवारी दुपारी घडली.
खोपोली येथे घरकाम करणाऱ्या सुनिता मोरे (रा. वर्धमाननगर) या दैनंदिन घरकामे करुन दुपारी साडेबारा वाजण्याच्या दरम्यान घरी जात होत्या. मोगलवाडी मार्गावरील हायवेच्या कॉर्नरजवळ ही महिला आल्यावर दोघेजण त्यांच्या समोर आले आणि ताई आम्ही खूप लांबून आलोय, खूप भूक लागली आहे, काहीतरी मदत करा, अशी विनवणी केली. त्या वेळी सुनीता मोरे यांनी बाजूच्या हॉटेलमध्ये त्यांना वडापाव खायला दिला. दरम्यान बोलता बोलता सुनीता मोरे यांना भूल देऊन त्यांच्याकडील रुमाल काढून समोर केले, त्या वेळी सुनीता यांनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी व कानातले असे एक तोळे सोने त्या रुमालात काढून दिले. या दरम्यान सुनीता यांना आपण काय करतोय हे कळालेच नाही. त्याबदल्यात या भामट्याने सुनीता यांना पैशाची गड्डी म्हणून वरती एक शंभरची नोट व त्याखाली नोटांच्या आकाराचे कागदाचे तुकडे दिले आणि काही कळायच्या आत हे भामटे पसार झाले. या प्रकारानंतर काही वेळानंतर शुद्धीवर आलेल्या सुनीता यांना आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.