मुंबई - वेगवेगळ्या हॉटेल्समधून कार्ड क्लोनिंग करून ग्राहकांच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डचा डेटा चोरून बनावट कार्ड तयार करून एटीएमद्वारे लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेच्या कक्ष - ७ ने अटक केली आहे.
पार्कसाईट पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल झाला होता. या तक्रादाराच्या बँक खात्यातून कर्नाटक धारवड येथून २४ हजार रुपये काढल्याचे त्याला समजताच त्याने तक्रार दाखल केली. त्यानंतर कक्ष - ७ च्या पोलिसांनी संबंधित बँकेच्या नोडल अधिकाऱ्याला बोलावून धारवड येथे एटीएममधून पैसे काढल्याअगोदर कुठे एटीएम ट्रान्झॅक्शन झाले होते याबाबत माहिती मागितली. त्यावेळी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीत सुनील हॉटेल, अपना ढाबा, अर्बन तडका, रेन फॉरेस्ट यापैकी एक हॉटेलात तक्रारदाराच्या डेबिट कार्डचा वापर केल्याचे दिसून आले. या सर्व हॉटेलात जाऊन तपास केला असता धनेश उर्फ करण टंडन नावाच्या इसमाने या सर्व हॉटेलमध्ये काही दिवसांकरिता काम केल्याचे आढळून आले. त्याची अधिक माहिती मिळविली. या माहितीत तो ग्राहकांच्या बिलाचे पैसे भरण्यासाठी डेबिट आणि क्रेडिट कार्ड हाताळायचा असे स्पष्ट झाले. लागलीच कक्ष ७ आणि मुलुंड पोलिसांनी धनेशच्या लोकेशनचा शोध पाडत त्याला छत्तीसगड येथील सेंद्री येथील अटक केली. त्याच्या चौकशीत धनेश हा हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकांच्या एटीएम कार्डचा डेटा स्किमर मशीनच्या साहाय्याने चोरी करून त्याचे पिन कोड नंबर एका कागदावर लिहून मिळालेली माहिती बनावट एटीएमद्वारे बेळगाव येथे राहणाऱ्या तुकाराम गुडाजी उर्फ विजय रेड्डीला पैसे काढण्यासाठी देत असे. तुकाराम धारवड, बेळगावातून एटीएम सेंटरमधून पैसे काढत असल्याचे अटक आरोपी तुकारामने कबुल केले. तुकारामचा माग काढत पोलिसांचे पथक बेळगाव, कर्नाटकात पोचले. मात्र तेथे तो सापडला नसल्याने पोलिसांनी त्याचा भाऊ मारुतीला ताब्यात घेतले. या आरोपींकडून ८ मोबाईल फोन्स, ७ लाख ६३ हजार , ३ स्किमर मशीन बँकेची पासबुक व पावती, शेकडो पिनकोड लिहिलेली वही, एक लॅपटॉप नवीन होंडा हॉर्नेट मोटार सायकल आदी सामान पोलिसांनी हस्तगत केले आहे.