पुणे : प्रवाशाला स्वस्तात राहायला जागा मिळावी त्याचवेळी घरमालकाला चार पैसे मिळावेत, यासाठी काऊच सर्फिंग ही वेबसाईट सुरु झाली आहे. मात्र, अशाप्रकारे घरात राहणाऱ्या एका तरुणाने आजारी ज्येष्ठ नागरिक महिलेचे एटीएम कार्ड चोरुन त्याद्वारे दोन दिवसात तब्बल ९० हजार रुपये लांबविले. अलंकार पोलिसांनी या तरुणाचा मुंबईत तब्बल तीन दिवस माग काढून त्याला बेड्या ठोकल्या.दिवाकर राघव मेहता (वय २५, रा़ जयपूर, राजस्थान) असे त्याचे नाव आहे. या प्रकरणी अश्विन पंडित यांनी अलंकार पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यांनी काऊच सर्फिंग या वेबसाईटवर आपल्या घरी पेइंग गेस्ट ठेवण्याविषयीची माहिती दिली होती. दिवाकर मेहता हा ट्रॅव्हल गाईड म्हणून काम करतो. तो पंडित यांच्याकडे यापूर्वी काही दिवस राहिला होता. त्यानंतर तो काही दिवसांपूर्वी पुन्हा आला. १५ दिवस राहिला. पंडित यांची आई आजारी असून त्या गादीवरुन उठू शकत नाही. पंडित हे दोन दिवस बाहेर गेले होते. त्यांच्या आईचे एटीएम कार्ड त्यांच्या खोलीत होते. बँकेने पाठविलेल्या पाकिटात एटीएम कार्ड व पिननंबर होता. मेहता याच्या ते लक्षात आले. त्याने कार्ड व पाकिट घेऊन त्याद्वारे दोन दिवसांत एटीएममधून ९० हजार रुपये काढले. बँकेतून पैसे काढल्याचा मेसेज आला पण तो आईच्या मोबाईलवर आला. पंडित बाहेरगावी असल्याने तो कोणी पाहिला नाही. त्यानंतर मेहता निघून गेला. दोन दिवसानंतर पंडित यांच्या लक्षात हा प्रकार आला.त्यांनी अलंकार पोलिसांकडे धाव घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्पना जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक सुरज गोरे व त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण करुन मेहता हा मुंबईतील चेंबरमध्ये असल्याची माहिती मिळविली. त्यानंतर पथक तीन दिवस मुंबईत त्याच्या मागावर होते. त्यांनी चेंबूरमधील इंदिरानगरमधून मेहता याला अटक केली़ तेथेही तो पेर्इंग गेस्ट म्हणून रहात होता. तेव्हा काऊच सर्फिंगवरुन भाडेकरु ठेवताना अधिक काळजी घ्या.
काऊच सर्फिंग वरुन भाडेकरु ठेवताय सावधान..! एटीएम चोरुन पैसे लांबवणाऱ्याला मुंबईतून अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 12:27 PM