पुणे : व्यवसायवृद्धीसाठी ५ कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून चोरट्यांनी बिटकॉईन खरेदी करायला लावले. त्यानंतर ते बिटकॉईन परस्पर विकत दोघांची तब्बल १७ लाख ५१ हजार २६२ रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी हितेश बुल्डे (रा. अहमदाबाद) आणि जिग्नेश सोनी यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सुरज यदूराज सूर्यवंशी (वय ४५, रा. जनवाडी) यांनी स्वारगेट पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. सूर्यवंशी यांचा एच. एस. गारमेन्ट नावाने कोथरुड येथे व्यवसाय आहे. त्यांचे मित्र नागनाथ परकाळे (रा. कोथरुड) हे बांधकाम व्यावसायिक आहेत. दोघांना व्यवसाय वाढविण्यासाठी पैशाची आवश्यकता होती. त्यांच्या ओळखीच्या जिग्नेश सोनी यांने हितेश बुल्डे यांच्याशी स्वारगेट येथील नटराज हॉटेलमध्ये भेट करुन दिली. तुम्हाला प्रत्येकी ५ कोटींचे कर्ज हवे असेल तुम्हाला बिटकॉईन खरेदीचे व्यवहार दाखवावे लागतील. तेव्हा दोघांनी त्याच्याकडून बिटकॉईन व्यवहारासाठी मोबाईल ॲपलिकेशन डाऊनलोड करुन घेतले. त्यानंतर त्यांनी बिटकॉईनचा व्यवहार सुरु केला.
एक दिवस हितेश यांचा सूर्यवंशी यांना फोन आला. तुमचा १ बिटकॉईनचा व्यवहार पूर्ण झाला आहे. पण परकाळे यांच्या १ बिटकॉईनचा व्यवहार पूर्ण करण्यासाठी त्यांचे खात्यावर पैसे कमी असल्याने तुमच्या खात्यावरील काही पैसे परकाळे यांच्या खात्यावर पाठवून १ बिटकॉईनचा व्यवहार पूर्ण करु असे सांगून त्यांच्याकडून मोबाईलवर आलेला ओटीपी नंबर घेतला. काही वेळातच सूर्यवंशी यांच्या खात्यातील सर्व १० लाख १६ हजार ९११ रुपये परकाळे यांच्या खात्यात जाऊन सूर्यवंशी यांचे खाते रिकामे झाले. त्यावर हितेश यांनी चुकून झाले. परकाळे यांच्या खात्यातून उरलेले पैसे तुमच्या खात्यात परत करतो, असे सांगितले. त्यानंतर परकाळे यांना असे सांगून तुमच्या खात्यावर आलेले सूर्यवंशी यांचे पैसे परत पाठविण्यासाठी त्यांच्याकडून ओटीपी नंबर घेतला. त्यांच्या खात्यावरील त्यांचे ७ लाख ३४ हजार ३५१ रुपये व सूर्यवंशी याचे पैसे असे १७ लाख ५१ हजार २६२ रुपये तिसऱ्याच खात्यात पाठविले. त्यानंतर त्यांनी वारंवार पैसे परत करण्यास सांगितले. अगदी अहमदाबाद येथे जाऊन त्यांच्याकडे पैसे मागितले. पण त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. शेवटी त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.