वाशिम : पोलीस असल्याची बतावणी करून रोकड, दागिने लुटल्याच्या घटना यापूर्वी जिल्ह्यात घडल्या आहेत. आता पुन्हा आठ दिवसाच्या फरकाने वाशिम शहरात तोतया पोलिसांनी दोन जणांचे दागिने लंपास केल्याचा प्रकार समोर आल्याने प्रत्येकाने तोतया पोलिसांपासून सावध होणे गरजेचे ठरत आहे.
सोशल मीडियावर फसवणुकीचे प्रकार वाढीस लागले आहेत. अलिकडच्या काळात तर पोलीस असल्याचे भासवून रोकड, दागिने लंपास केल्याचे प्रकारही घडले आहेत. सोन्याचे दागिने घालून शहरातून फिरू नका, पुढे तपासणी सुरू आहे, तुमच्याकडील वस्तू दाखवा, दागिने द्या, खिसे पाहू द्या.... असे सांगून तोतया पोलिसांकडून फसवणूक होण्याच्या प्रकारातही वाढ होत असल्याने प्रत्येकाने सावध होणे आवश्यक आहे. दोन तोतया पोलिसांनी पोलीस असल्याची बतावणी करुन वाशिम येथील ५६ वर्षीय इसमाच्या हातातील १७ ग्रामच्या तीन अंगठ्या काढून घेतल्याची घटना ३ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास लाखाळा येथील दूध डेअरी ते पेट्रोल पंप दरम्यान घडली.
आठ दिवसांपूर्वी सिंधी कॅम्प येथेही असाच प्रकार घडला होता. मार्च महिन्यात मंगरुळपीर तालुक्यातही दोन वेगवेगळ्या घटनेत तोतया पोलिसांनी दोन इसमांच्या हातातील ६० हजार १९१ रुपये किमतीच्या अंगठ्या पाळविल्या होत्या. या प्रकरणी २ मार्च रोजी एकाने पोलिसांत तक्रारही दिली होती. संभाव्य फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी तोतया पोलिसांबाबत अधिक दक्ष राहणे आवश्यक ठरत आहे.