पुणे : जंगली महाराज रस्त्यावर रिक्षा प्रवासी महिलेची पिशवी दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावली.सुदैवाने पिशवी ओढताना महिलेचा तोल गेला नाही. अन्यथा एखादी दुर्घटनाही संभवत होती. त्यामुळे आता फक्त दुचाकीवर बसताना नव्हे तर रिक्षा नसतानाही खबरदारीही बाळगावी लागणार आहे.
शिवाजीनगर ते वारजे या मार्गावर साखळी चोरांसारखी कार्यपध्दती अवलंबवत सकाळच्या वेळी रिक्षातील महिलांच्या पर्स चोरण्याच्या घटना होत आहेत. रिक्षाचा वेग कमी होताच दुचाकीवरुन आलेले चोरटे पर्स हिसकावून पळ काढतात. या गुन्हेगारांचा माग अद्यापही पोलिसांना लागला नाही. पोलीस उपायुक्त बसवराज तेली यानी हे प्रकार रोखण्यासाठी दोन आठवड्यापुर्वीच सकाळच्या वेळेत गस्त वाढवण्याचे आदेश दिले होते.
या घटनेत कोमल सुरेश अग्रवाल (वय २७,रा. स्नेहनगर, विजयानगर कॉलनी, सदाशिव पेठ, मूळ रा. जळगाव जामोद, बुलढाणा) यांनी यासंदर्भात डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अग्रवाल यांनी दिलेल्या फियार्दीनुसार दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अग्रवाल शुक्रवारी सकाळी परगावाहून पुण्यात आल्या. जंगली महाराज रस्त्यावरुन त्या रिक्षाने सदाशिव पेठेत निघाल्या होत्या. संभाजी उद्याानाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर दुचाकीस्वार चोरट्यांनी अग्रवाल यांच्या हातातील पिशवी हिसकावली. पिशवीत दोन मोबाइल, सात हजार रुपये रोख आणि कागदपत्रे असा ऐवज होता.
दुसरीकडे सेनापती बापट रस्ता परिसरात दुचाकीस्वारांची सोनसाखळी चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. सकाळी सहाच्या सुमारास सेनापती बापट रस्त्यावर वनविभागाच्या कार्यालयानजीक दुचाकीस्वार अभिजीत देशपांडे (वय ५०,रा. डेक्कन) यांच्या गळयातील साठ हजारांची सोनसाखळी दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेली. पोलीस उपनिरीक्षक राहुल कोलंबीकर याबाबत पुढील तपास करीत आहेत.
रेल्वे स्थानक तसेच एसटी स्थानक परिसरात सकाळी येणारे प्रवासी चोरट्यांचे सावज आहे. रिक्षाने निघालेल्या प्रवाशांकडील पिशवी हिसकावून चोरटे पसार होतात. गेल्या दीड महिन्यात अशा प्रकारच्या दहा ते बारा घटना घडल्या आहेत. यापूर्वी पिशवी हिसकावण्याचे गुन्हे एरंडवणे, नळस्टॉप चौक, कोथरूड, स्वारगेट, येरवडा भागात घडले आहेत.