बीड : जिल्ह्यातील गुन्हेगारांवर हद्दपार, एमपीडीए, मोक्काच्या कारवाया करुन जिल्हा पोलीस दलाने वचक निर्माण केला. त्यामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी मध्यंतरी कमी झाली होती. गत तीन दिवसांपासून जिल्ह्यात पुन्हा दरोडेखोर, चोरांनी धुमाकूळ घातला आहे. आज पहाटे परळी व नेकनूरमध्ये सहा दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. हे सर्व गुन्हेगार परभणी, नगर, औरंगाबाद जिल्ह्यातील असल्याचे समोर आले असून बीड पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांचे प्रयत्न विफल ठरले.
घटना क्रमांक १ : परभणीच्या गुन्हेगारांचा अंबाजोगाईत अयशस्वी प्लॅनपरभणी जिल्ह्यातील सहा दरोडेखोर रविवारी रात्री बसने परळीला आले. येथून रिक्षाने अंबाजोगाईला गेले. येथे एका ठिकाणी जीप चोरण्याचा प्रयत्न केला. परंतु हॉर्न वाजल्याने परिसरातील नागरिक जागे झाले अन् त्यांचा प्रयत्न फसला. पुढे प्रशांतनगर भागात जाऊन त्यांनी कार (एमएच १३ एसी ५६१०) चोरली. या कारमधूनच दरोडा टाकण्यासाठी ते घर शोधत होते. एवढ्यात अंबाजोगाई शहर ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मारुती मुंडे हे गस्त घालताना त्यांना आडवे गेले. पोलिसांना पाहून कार सुसाट धर्मापुरी मार्गे घाटनांदूरकडे गेली.
त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करुन यातील करनसिंग गगनसिंग टाक (रा. साकला, जि. परभणी) याला पकडले. इतर दरोडेखोर मात्र बाजूला असलेल्या जंगलाचा फायदा घेऊन पसार झाले. अपर पोलीस अधीक्षक अजित बो-हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाई शहर ठाण्याचे सपोनि मारुती मुंडे व त्यांचे टीम, अंबाजोगाई ग्रामीण व शहर, परळी ग्रामीण व शहर या पोलिसांनी कारवाईसाठी परिश्रम घेतले.
घटना क्रमांक २ : जामखेडपासून पाठलाग करुन महाजनवाडीत पाच दरोडेखोर जेरबंदजामखेडमार्गे बीड जिल्ह्यात दरोडा टाकण्यासाठी नऊ जणांची टोळी येत असल्याची माहिती बीड पोलिसांना मिळाली. त्याप्रमाणे दरोडा प्रतिबंधक पथकाने नेकनूर पोलिसांच्या मदतीने जामखेडपासूनच पाठलाग केला. बीड तालुक्यातील महाजनवाडी परिसरात सापळा लावला. तीन दुचाकींवरुन नऊ जण येत असल्याचे दिसताच पोलिसांनी झडप घातली. यावेळी त्यांनी अंधाराचा फायदा घेत पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, दरोडा प्रतिबंधक, नेकनूर पोलीस व आरसीपीच्या जवानांनी त्यांचा पाठलाग करुन नऊपैकी पाचजणांना अटक केली. यामध्ये योगेश विष्णू पवार (३०, अहमदनगर), शहादेव राजाभाऊ चादर (३०, क्रांतीनगर, पाटोदा), आकाश अशोक चव्हाण (२४, मुकींदपूर, अहमदनगर), राहुल शाम काळे (२५, हर्सूल तलावाजवळ, औरंगाबाद), भूपेंद्र महावीर सहानी (रा. मुज्जफरपूर, बिहार) यांचा आरोपीत समावेश आहे. पहाटे तीनच्या सुमारास हा थरार घडला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बो-हाडे, उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. भाऊसाहेब गोंदकर, सपोनि गजानन जाधव, पोउपनि वाटोरे, भारत माने, मुंजाबा सौंदरमल, राजाभाऊ नागरगोजे, श्रीमंत उबाळे, संजय खताळ, हरिभाऊ बांगर, अशोक दुबाले, भारत बंड, राहुल शिंदे, चालक साबळे, सोनवणे, डोंगरे, गौतम वाघमारे, महेश अधटराव, ढाकणे, काळे, बागवान, यादव यांनी केली.