पुणे (विमाननगर ) : कंटेनमेंट झोन मधील भाजी विक्रीची गाडी बंद करण्यासाठी गेलेल्या पोलिस शिपायाला बेदम मारहाण केल्याची गंभीर घटना शुक्रवारी घडली. याप्रकरणी पोलिस शिपाई विनायक मधुकर साळवे यांना मारहाण करणाऱ्या सहा आरोपींविरुद्ध शासकीय कामात अडथळा सह इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. येरवडा कंटेनमेंट झोन मध्ये दोन महिन्यात पोलीस मारहाणीची ही तिसरी गंभीर घटना आहे. याप्रकरणी वसीम मोगले व हैदरअली मोगले या बापलेकाला अटक करण्यात आली असून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहेत. नावेद सौदागर, राहुल साळवे यांच्यासह दोन महिला आरोपी शमीम सय्यद व अम्रीन सय्यद हे चार आरोपी फरार आहेत. येरवडा कंटेनमेंट झोनमध्ये आवश्यक भाजीपाला व किरकोळ विक्रीसाठी सकाळी नऊ ते दुपारी दोन अशी वेळ महापालिका आयुक्तांनी दिलेली आहे. शुक्रवारी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास लक्ष्मीनगर येथील जुन्या मोझे शाळेसमोर भाजी विक्री करणाऱ्या नावेद सौदागर व राहुल साळवे यांना पोलीस शिपाई विनायक साळवे यांनी भाजी विक्री ची वेळ संपली असून हात गाडी काढून घेण्यास सांगितले. त्याचा राग आल्यामुळे सौदागर भाऊ साळवे यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. या ठिकाणी असणाऱ्या महिला शमीम सय्यद व अमरीन सौदागर यांच्यासह वसीम मोगले व हैदर अली मोगले या सहा जणांनी बेकायदेशीर जमाव जमवून पोलीस शिपाई विनायक साळवे यांना हाताने मारहाण केली. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून दोघा आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्यातील चार आरोपी फरार असून त्यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत किरवे करीत आहेत. येरवडा कंटेनमेंट झोनमध्ये तीन पोलिसांवर हल्ले - येरवडा कंटेनमेंट झोन मध्ये काम करणे पोलिसांसाठी अवघड झाले असून मागील दोन महिन्यात तीन पोलिसांवर हल्ले करण्यात आलेले आहेत. येरवडा पोलिस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांसह गुन्हे शाखेच्या एका पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ले झालेले आहेत. कंटेनमेंट झोनमधील गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. त्यातच जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या पोलिसांवरच हल्ला करण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसते.
येरवडा कंटेन्मेंट झोनमध्ये पोलिसाला बेदम मारहाण, 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 6:50 PM
भाजी विक्रीची गाडी बंद करण्यासाठी पोलीस कर्मचारी गेला होता..
ठळक मुद्देयाप्रकरणी 2 जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात