कामशेत: पवन मावळातील मौजे कडधे गावच्या हद्दीतील हॉटेल सुवर्ण सम्राट महागावचे येथे चार जन जेवणासाठी गेले होते. जेवण झाल्यानंतर आचारी बिल मागण्यासाठी गेला असता त्याला शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत त्याच्या कपाळावर काचेची बाटली फोडल्याने तो जखमी झाला आहे. याप्रकरणी आचारी निवृत्ती बंडू सुतार ( वय ३६, रा. मळवंडी ठुले ) यांनी कामशेत पोलिसात फिर्याद दिल्यानुसार प्रकाश सावंत, स्वप्नील तरस, व त्यांचे बरोबर दोन अनोळखी इसम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार ( दि. ६ ) रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास कडधे गावच्या हद्दीतील हॉटेल सुवर्ण सम्राट येथे प्रकाश सावंत, स्वप्नील तरस, ( पूर्ण नाव माहित नाही ) व त्यांचे बरोबर दोन अनोळखी इसम ( रा. थुगाव, मावळ ) हे जेवणासाठी आले होते. जेवण झाल्यानंतर बिल घेण्यासाठी हॉटेलचे आचारी निवृत्ती बंडू सुतार ( वय ३६, रा. मळवंडी ठुले ) गेले असता बिल मागितल्याच्या कारणावरून चिडून जावून शिवीगाळ करीत हाताने लाथाबुक्क्यांनी त्यांना मारहाण केली. तर प्रकाश सावंत याने शेजारील काचेची बाटली त्यांच्या उजव्या डोळ्याच्या वर कपाळावर मारून निघून गेले. यात सुतार जखमी झाले त्यांना हॉटेल व्यवस्थापक सीताराम शेट्टी यांनी उपचारासाठी कामशेत येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले.
जेवणाचे बिल मागितल्याच्या कारणावरून आचाऱ्याला मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2019 8:33 PM