लोणावळा : भुशी धरणाच्या पायर्यांवर एकमेकांच्या पॅन्ट ओढत दंगा करणार्या युवकांना रागावल्याचा राग मनात धरत धरणावरुन माघारी निघालेल्या पोलीस कर्मचार्याला संगनमत करुन जबर मारहाण करण्यात आली. या प्रकरणी लोणावळा शहर पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. गुरुवारी (दि. ८ ऑगस्ट ) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल सुभाष दत्तु शिंदे यांच्या डोक्याला मार लागला आहे.
शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन, राहुल लालासाहेब कदम (वय 30), राहुल दिलीप गुणवरे (वय 30), अतुल अंबादास गुणवरे (वय 30), पवन शिवाजी गुणवरे (वय 28), दत्तात्रय कुंडलिक गुणवरे (वय 28 सर्व राहणार स्वामी चिंचोली, गुणवरे वस्ती, दौंड पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंड येथील पाच युवक गाडी भाड्याने करत आज लोणावळ्यात फिरायला आले होते. दुपारच्या सुमारास दारु पिऊन भुशी धरणावर आले. आल्यापासून त्यांची हुल्लडबाजी सुरु होती. त्यांनी धरणावर बंदोबस्ताला असलेल्या पोलीस कर्मचारी शिंदे यांनी समज दिली. यानंतर त्यांचा दंगा सुरु होता. ते पायर्यांवर एकमेकाच्या पॅन्टी खाली खेचत धुडगुस घालत होते यावेळी त्यांना धरणाच्या पायर्यांवरुन हाकलण्यात आले. सायंकाळी सहा वाजता धरणावरील सर्व पर्यटकांना बाहेर काढत शिंदे हे पोलीस ठाण्याकडे येण्यासाठी निघाले असता कदम व गुणवरे यांनी संगनमत करत शिंदे यांना वेढा घालत मारहाण करण्यास सुरुवात केली. यामध्ये शिंदे याच्या कपाळाला डोळ्याच्यावर मार लागला आहे. पोलीसांना मारहाण करत असल्याचे पाहून स्थानिक नागरिक व काही पर्यटकांनी शिंदे यांना त्याच्या तावडीतून सोडवत दोन जणांना पकडले तर तिन जण घटनास्थळावरुन पळून गेले. या सर्वांना पोलीस पथकाने शोध घेत रात्री पडकून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.
सार्वजनिक शांतता भंग करणार्या दोघांवर प्रतिबंधात्मक कारवाई
दारु पिऊन सार्वजनिक शांततेचा भंग करत शिविगाळ करणार्या दोन जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. संजय बंडू तलावडे (वय 25, रा. न्यु हनुमाननगर, एम.जी. रोड, मुंबई वेस्ट) व गजेंद्र झोरे (वय 39, रा. तीन डोंगरी, यशवंतनगर झोपडपट्टी, मुंबई) याच्यावर ही कारवाई करण्यात आली असून ते पोलीस ठाण्यात आल्यानंतर देखिल पोलीसांना व इतरांना शिविगाळ करतच होते अशी माहिती पोलीसांनी दिली.