कल्याण - अंगात भुत आहे ते भुत तंत्रमंत्र करून बाहेर निघेल या अंधश्रध्देपोटी अंगावर हळद टाकून काठीने केलेल्या बेदम मारहाणीत पंढरीनाथ शिवराम तरे (वय 50) आणि चंदुबाई शिवराम तरे (वय 76) या मायलेकाचा मृत्यू झाल्याची घटना येथील पश्चिमेकडील अटाळी गावात शनिवारी संध्याकाळी घडली. जवळच्या नातेवाईकांकडून घडलेल्या या अघोरी प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी मांत्रिकासह अन्य तिघांना अटक केली आहे. आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.अटाळी येथील गणेशनगरमधील शिवचंद्र सदनमध्ये राहणारे पंढरीनाथ यांची पुतणी कविता कैलास तरे हिचे अंगात दैवीशक्ती संचारते या संशयातून पंढरीनाथ यांची पत्नी रेश्मा आणि दुसरी पुतणी संगिता ही कविता ला अटाळी गावात राहणा-या सुरेंद्र पाटील या मांत्रिकाकडे तंत्रमंत्र उपचारासाठी घेवून जात असे. त्यावेळी मांत्रिक पाटील याने त्यांना पंढरीनाथ आणि त्यांची आई चंदुबाई या दोघांच्या अंगात भुत आहे व त्यांच्या अंगातील भुत तंत्रमंत्र करून बाहेर काढावे लागेल असे सांगितले.मांत्रिकाने सांगितल्याने अंधश्रध्देपोटी पंढरीनाथच्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने आणि पुतण्या विनायक तरे, पुतणी कविता या तिघांनी शनिवारी दुपारी 4.30 वाजता पंढरीनाथ आणि त्याची वयोवृध्द आई चंदुबाई यांच्यावर तंत्रमंत्र करून तसेच त्यांच्या अंगावर हळद टाकून त्यांना काठीने बेदम मारहाण केली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहीती मिळताच पोलिस उपायुक्त विवेक पानसरे, सहाय्यक पोलिस आयुक्त जे.डी. मोरे यांच्यासह खडकपाडा पोलिस ठाण्यातील अधिका-यांनी घटनास्थळी धाव घेतली. यात पंढरीनाथच्या अल्पवयीन मुलासह विनायक तरे (वय 22), कविता तरे (वय 27) यांच्यासह मांत्रिक सुरेंद्र पाटील यालाही ताब्यात घेऊन चौघांवर गुन्हे दाखल केले आहे. याप्रकरणाचा तपास खडकपाडा पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक अशोक पवार करीत आहेत.
अंगात भूत असल्याच्या अंधश्रद्धेपोटी मारहाण, मायलेकाचा मृत्यू, मांत्रिकासह तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2020 1:16 PM