परळी: भिशीच्या पैशाच्या व्यवहारातून शहरात एका डॉक्टर दाम्पत्यास बेदम मारहाण करून महिला डॉक्टरचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला. ही खळबळजनक घटना २० जानेवारीला दुपारी साडेबारा वाजता शहरात घडली. याप्रकरणी सात जणांवर विनयभंगाचा गुन्हा नोंद झाला असून, आरोपी अद्याप फरार आहेत.
पीडित महिला डॉक्टर व त्यांचे पती यांचा शहरात खासगी दवाखाना आहे. २० रोजी दुपारी रुग्णांची तपासणी सुरू असताना तेथे जीवन फडकरी (रा. माधवबाग, परळी), अभय बळवंत (रा. हमालवाडी, परळी) व अनोळखी पाच महिला आल्या. त्यांनी रुग्णांना बाहेर व्हा, असे सुनावत थेट पीडित महिला डॉक्टरच्या पतीची कॉलर पकडून बाहेर खेचत आणले. यावेळी पीडित डॉक्टरने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता हात पकडून विनयभंग करत धमकी दिली. त्यानंतर पतीला बुक्की मारून दात पाडला. त्यांच्या खिशातील मोबाइल, एक हजार रुपये व घराची चावी काढली. यावेळी पीडित डॉक्टरला रिक्षात बसवून अपहरण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पीडितेचे पती मदतीला धावल्यानंतर त्यांना मारहाण करून शिवीगाळ करत आरोपींनी पोबारा केला. याबाबत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
आरोपींचा शोध सुरूदरम्यान, घटनास्थळी शहर ठाण्याचे पो. नि. उमाशंकर कस्तुरे, सहायक निरीक्षक भार्गव सपकाळ यांनी भेट दिली. आरोपींचा शोध घेणे सुरू असल्याचे सहायक निरीक्षक सपकाळ यांनी सांगितले.
... सात लाखांचे मागितले सव्वा कोटी
आरोपी जीवन फडकरी याच्याकडे पीडित डॉक्टरची २०१६ मध्ये भिशी होती. दवाखान्याच्या कामासाठी पीडित डॉक्टरने त्याच्याकडून सात लाख २० हजार रुपये घेतले होते. त्यानंतर त्या पैसे परत करण्यासाठी गेल्या असता एक कोटी २६ लाख रुपयांची मागणी केली, असे पीडित डॉक्टरने फिर्यादीत नमूद केले आहे.