अनिकेत घमंडी, डोंबिवली: वीजबिल थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करणाऱ्या दोन बाह्यस्त्रोत महिला वीज कर्मचाऱ्यांना मारहाण आणि शिवीगाळ करण्याचा संतापजनक प्रकार कल्याण पूर्वेतील काटेमानिवली परिसरात बुधवारी घडला. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात पती-पत्नी व मुलीविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या विविध १० कलमांन्वये गुन्हा दाखल झाला आहे.
हेमलता पावशे व त्यांचे पती व त्यांची मुलगी (सर्व राहणार पार्वतीबाई सदन, हरिभाऊ पाडा, कैलासनगर, काटेमानिवली) अशी या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. प्रियसी पडवळ आणि पल्लवी टोळे या बाह्यस्त्रोत कर्मचारी बुधवारी दुपारी थकबाकीदार ग्राहक गजानन पावसे यांचा वीजपुरवठा खंडित करण्यास गेल्या होत्या. वीजपुरवठा खंडित करून परत निघालेल्या पल्लवी टोळे यांना हेमलता पावसे यांनी मारहाण केली व केसांना पकडून त्यांच्या घरात फरफटत नेले.
या घटनेचे व्हिडिओ आणि फोटो घेणाऱ्या प्रियसी पडवळ यांचा मोबाईल हिसकावून घेत हेमलता पावसे यांच्या मुलीने मोबाईलमधील पुरावे नष्ट केले. तर पावसे यांच्या पतीने घटनास्थळी पोहचत दोन्ही बाह्यस्त्रोत महिला कर्मचाऱ्यांना अश्लिल शिवीगाळ केली. भेदरलेल्या बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांनी पोलीस मदत केंद्राला तसेच महावितरणच्या स्थानिक अधिकाऱ्यांना संपर्क साधत कोळसेवाडी पोलीस ठाणे गाठले. पडवळ यांच्या फिर्यादीवरून हेमलता पावसे, त्यांचे पती आणि मुलीविरुद्ध भारतीय दंड संहिते अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरिक्षक उल्हास जाधव या गुन्ह्याचा तपास करत असल्याचे महावितरणने प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले.