मुंबई : रिक्षातून तीनहून अधिक प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या रिक्षाचालकाला पोलिसांनी हटकले. याच रागात रिक्षातील तृतीयपंथीयांकड़ून वाहतूक पोलिसाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी चार तृतीयपंथीयांना अटक केली. लहू मकासरे, विक्की कांबळे, तनू ठाकूर आणि जेबा शेख अशी अटक आराेपींची नावे आहेत.
विनोद सोनावणे असे मारहाणीत जखमी झालेल्या वाहतूक पाेलिसाचे नाव आहे. त्यांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीनुसार १६ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ते छेडानगर जंक्शन परिसरात वाहतुकीचे नियोजन करत होते. त्यावेळी तीनहून अधिक प्रवासी एका रिक्षातून प्रवास करताना त्यांच्या निदर्शनास आले. काेराेना संसर्गाचा काळ तसेच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्यांनी रिक्षा थांबवली व रिक्षाचा फोटो काढू लागले. त्यावेळी रिक्षातील एक तृतीयपंथी खाली उतरून सोनावणे यांच्याशी वाद घालू लागला. रागाच्या भरात त्याने सोनावणे यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर रिक्षातील इतर तीन तृतीयपंथीयही बाहेर आले व साेनावणे यांना त्यांनी मारहाण केली. या वादात सोनावणे यांचा गणवेशही फाटला. त्यांच्या हातातील वॉकीटॉकी हिसकावून त्यांनी जमिनीवर फेकला.
गुन्ह्यांची नोंदघटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सोनावणे यांना रुग्णालयात दाखल केले. मारहाण करणाऱ्या चारही तृतीयपंथीयांविरुद्ध सरकारी कामात अडथळा, मारहाणप्रकरणी गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली.