मुंबई : मालाडच्या कुरार पोलिसांनी मंगळवारी रात्री आर्थिक गुन्हे शाखेशी ( ईओडब्ल्यू ) संलग्न असलेल्या एका सहायक पोलीस निरीक्षकाला अटक केली. याच विभागाशी संलग्न असलेल्या एका महिला पोलीस निरीक्षकाला शिवीगाळ, मारहाण आणि विनयभंग केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.
अटक करण्यात आलेल्या पोलिसाचे नाव दीपक देशमुख (४९) असे असून तो ईओडब्ल्यू शाखेत सहायक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देशमुख याचे पीडितेसोबत एकतर्फी प्रेमसंबंध होते. मात्र तिचा त्यास विरोध होता. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून तो तिचा मानसिक छळ करत होता. अखेर कंटाळून पीडितेने याबाबत वरिष्ठांकडे तक्रार केली. तक्रारीच्या आधारे आरोपीची दुसऱ्या विभागात बदली करण्यात आली. मात्र, त्यानंतरही आरोपी पीडितेचा मानसिक छळ करत होता. तसेच कुरार येथील तिच्या घरीही जाण्यास त्याने सुरवात केली. त्यामुळे नाईलाजास्तव काही महिन्यांपूर्वी पीडितेने कुरार पोलिसांकडे लेखी तक्रार दिली, असे कुरार पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले.
आरोपीला त्याचे म्हणणे नोंदवण्यासाठी बोलावण्यात आले; पण तो आला नाही. तसेच मंगळवारी रात्री आरोपी हा पुन्हा फिर्यादीच्या घरी गेला. तिथे जाऊन त्याने तिला शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. तेव्हा तिने पोलिसांना फोन केला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेत अटक केली.