डोंबिवली: लॉकडाऊनमुळे काम न राहिल्याने उदरनिर्वाहासाठी फॅशन डिझाईनरने बाईक चोरीचा मार्ग अवलंबिल्याचे समोर आले आहे. चोरी केलेल्या बाईक त्याने ओएलएक्सवर बनावट कागदपत्रंच्या माध्यमातून विकल्या त्याचबरोबर आरटीओचीही फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. युसुफ शकील अहमद खान (वय 38) असे फॅशन डिझाईनरचे नाव असून त्याला खोणी पलावा परिसरातील लेकशोअर येथून मानपाडा पोलिसांनी अटक केली.
त्याच्याकडून 1 लाख 60 हजार रूपये किमतीच्या एकूण चार चोरीच्या बाइक जप्त केल्या आहेत.डोंबिवलीत बाइक चोरीचे प्रमाण वाढले आहे. सहाय्यक पोलिस आयुक्त जे. डी. मोरे यांनी चोरटय़ांच्या शोधासाठी विशेष पथके तयार केली आहेत. मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक बाईक चोरीचा तपास करीत होते. याच दरम्यान एका चोरी गेलेल्या बाइकचे चलान कापल्याचा मेसेज ज्या व्यक्तीची बाईक चोरीला गेली होती त्याच्या मोबाईलवर आला. त्या व्यक्तीने याची माहिती मानपाडा पोलिसांना दिली.
पोलिस उपनिरिक्षक सुनिल तारमळे यांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. चोरीला गेलेली बाइक पुण्याचा एक व्यक्ती वापरत होता. जेव्हा पोलिसांचे पथक त्या व्यक्तीकडे गेले त्यावेळी त्याने रितसर कागदपत्रे तयार करुन ही बाईक विकत घेतल्याचे सांगितले. ओएलएक्सच्या माध्यमातून हा व्यवहार झाल्याचेही त्याने सांगितले. चौकशीत या व्यक्तिला समीर शेख नावाच्या व्यक्तीने बाईक विकल्याचे उघड झाले. समीर शेख नावाचा व्यक्तिच अस्तित्वात नाही. अखेर तांत्रिक तपासाच्या आधारे यूसूफ खानला पोलिसांनी शोधून काढले. यूसूफ खान हा डोंबिवली येथील पलावा सिटीत राहणारा आहे. तो फॅनश डिझाईनर होता. लॉकडाऊनमध्ये त्याला काम नसल्याने तो बेरोजगार होता. त्याने चोरीची शक्कल लढविली. त्याने चार बाईक चोरल्या. चारही बाइकचे खोटी कागदपत्रे तयार करु न ओएलएक्सच्या माध्यमातून त्या विकल्या होत्या. यूसूफने बाईक विकत घेणा-यांचीच नाही तर कल्याण आरटीओचीही फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. त्याच्यावर बाइक चोरीसह फसवणूकीचा गुन्हा देखील दाखल झाला आहे. त्याने मानपाडा, तळोजा हद्दीत प्रत्येकी 1 तर खारघर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दोन बाइक चोरल्या होत्या अशी माहीती सहाय्यक पोलिस आयुक्त मोरे यांनी दिली.