मुंबई - महाराष्ट्रचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची दुसरी पत्नी करुणा मुंडे यांच्या मुंबईमधील सांताक्रुझ येथील घरात बीड पोलीस दाखल झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे. आयपीएस अधिकारी सुनील जायभये यांच्या नेतृत्वाखाली हे पथक मुंबईत दाखल झाल्याचेही समजते. याप्रकरणी जायभये यांना संपर्क केला असता अधिक माहिती देण्याचे त्यांनी टाळले. सध्या हे पथक सांताक्रुझ पोलीस ठाण्यात असल्याचेही समजते.
परळी दौऱ्यावर आलेल्या करुणा मुंडे यांच्यावर ५ सप्टेंबर रोजी जातिवाचक शिवीगाळ करून चाकूहल्ला केल्याप्रकरणी ॲट्रॉसिटी व खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद करण्यात आला. ६ सप्टेंबर रोजी करुणा शर्मा व त्यांच्यासोबत असलेल्या अरुण दत्तात्रय मोरे यांना अंबाजोगाई येथील सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्या. सुप्रिया सापतनेकर यांनी करुणा यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले, तर अरुण मोरे यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
विशाखा रविकांत घाडगे यांच्या फिर्यादीनुसार, ५ सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजता त्या बेबी छोटूमियां तांबोळी यांच्यासह वैद्यनाथ मंदिरात दर्शनसाठी गेल्या होत्या. यावेळी करुणा मुंडे आणि अरुण मोरे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याबद्दल अपशब्द काढत होते. याचा जाब विचारल्याने करुणा मुंडेंनी त्यांना जातिवाचक शिवीगाळ करत बेबी छोटूमियां तांबोळी हिच्या उजव्या हातास धरून खाली पाडले, तर अरुण दत्तात्रय मोरे याने चाकूने त्यांच्या पोटावर वार केला.
चालकासह जमावावरही गुन्हा
गाडीत आढळलेल्या पिस्तूलप्रकरणी करुणा मुंडे यांचा चालक दिलीप पंडित याच्यावर गुन्हा नोंद करुन त्यास अटक करण्यात आली . करुणा मुंडे यांच्या तक्रारीवरुन जमावाविरुध्द कोविड नियमांचा भंग करुन बेकायदेशीर गर्दी जमविल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांची निष्काळजी झाली असेल तर चौकशी करुन दोषींवर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी दिली.