मीरारोड - काशीमीरा भागातील लग्न असलेल्या घरातून दागिने, रोख चोरून नेणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना काशीमीरा पोलिसांनी दिल्ली व उत्तर प्रदेश येथून अटक केली आहे. त्यांच्याकडून साडे आठ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे लग्नाच्या एक दिवस आधी पोलिसांनी त्या कुटुंबास ऐवज परत मिळवून दिला.
मीरागाव येथील न्यू श्री गणेश कृपा इमारतीत राहणारे प्रवीण शेट्ये यांच्या मुलाचे २७ नोव्हेंबर रोजी लग्न आहे. मुलाचे लग्न असल्याने त्यासाठी आधीच दागिने, रोख आदीची व्यवस्था करून ठेवली होती. ५ नोव्हेंबर रोजी दुपारी अडीज वाजता शेट्ये हे लग्नाचा हॉल बघण्यासाठी म्हणून बाहेर गेले होते. साडेचार वाजता ते परत आले असता घराचे टाळे व लॅच तोडून कपाटातील ७ लाख ३५ हजारांचे दागिने व २ लाख रोख असा ९ लाख ३५ हजारांचा ऐवज चोरून नेला असल्याचे आढळले.
लग्न तोंडावर असताना दागिने व रोख चोरीला गेल्याने शेट्ये कुटुंब चिंतातूर झाले होते. काशीमीरा पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक संजय हजारे व निरीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रशांत गांगुर्डे, उपनिरीक्षक निखिल चव्हाण व प्रकाश कावरे सह सचिन हुले, हणुमंत तेरवे, परेश पाटील, निलेश शिंदे, सुधीर खोत, राहुल सोनकांबळे, रविंद्र कांबळे व जयप्रकाश जाधव यांच्या गुन्हयांचे घटनास्थळाची पाहणी करुन प्राथमिक पुरावे, सीसीटीव्ही आदी हस्तगत केले. आरोपींची गाझीयाबद व दिल्ली येथून येऊन गुन्हा केल्याचे समजल्यानंतर पोलीस पथकाने वेशभुषा बदलुन गाजियाबाद येथून हबीब हाफिज सैफी (४५) ह्याला अटक केली.
चौकशीत साथीदार रमेश ऊर्फ कालु बैसाखीराम राजपुत व अकबर सुलतान सैफी दोन्ही रा. नवी दिल्ली यांच्यासोबत मिळून घरफोडी केल्याचे समोर आले. पोलिसांनी रमेशला नवी दिल्लीच्या शहादरा भागातून अटक केली. रमेश याने चोरलेले सोन्याचे दागिने दादासाहेब ऊर्फ पिंटू रामचंद्र मोहिते कडे वितळविण्यासाठी दिली असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी मोहितेकडून ७ लाख ३५ हजार किमतीची २२ तोळे वजानाची सोन्याची लगड हस्तगत केली. शिवाय आरोपींकडून १ लाख ३३ रोख मिळाली.
आरोपी हे घरफोडीसाठी विमानाने येत असत. एकावर १५ तर एकावर ८ गुन्हे दाखल आहेत. गुन्हा करण्यासाठी जाताना ते नाव बदलत. तसे आधारकार्ड सुद्धा बनवून घेत. आरोपींची केरळमध्ये सुद्धा गुन्हा केला आहे. पोलिसांनी लग्नाच्या एक दिवस आधीच दागिने व रोख मिळवून दिल्याने शेट्ये कुटूंबाने आनंद व्यक्त करत पोलिसांचे आभार मानले आहेत.