राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (NIA) सुरु असणाऱ्या मुकेश अंबानी निवासस्थानाबाहेरील स्फोटक प्रकरणात आता एक नवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणातील मुख्य संशयित असलेले सचिन वाझे यांनी ते राहत असलेल्या साकेत कॉम्प्लेक्समधील सीसीटीव्ही फुटेज गायब केल्याचा NIAला संशय वाटत आहे. यासंदर्भातील सोसायटीसोबत CIU चे API रियाझ काझी यांनी केलेला पत्रव्यवहार समोर आला आहे. २५ फेब्रुवारीला अंबानींच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकं सापडली आणि लगेच २७ फेब्रुवारीला हे पत्र काझी यांनी सोसायटीला लिहिलं.
हे पत्रे साकेत कॉम्प्लेक्सच्या सचिवांना API काझी यांनी लिहिले आहे. यामध्ये त्यांनी आपल्या सोसायटीचे सीसीटीव्ही फुटेज असलेला डीव्हीआर CRPC कलम ४१ अन्वये देण्याबाबत उल्लेख केला आहे. त्यामुळेच रियाझ काझी यांची गेले चार दिवस NIA कसून चौकशी करत आहे. सचिन वाझे यांच्या गुप्तवार्ता शाखेने (CIU) साकेत कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या सीसीटीव्ही कमेऱ्याचे फुटेज सोसायटीकडून मागितले होते, पत्रावर २ डीव्हीआर मिळाल्याबाबत काझी यांनी सही केली आहे. त्यामुळे अंबानी प्रकरणाचा आणि साकेत कॉम्प्लेक्समधील सीसीटीव्ही फुटेजचा काय संबंध ? तर पूर्वनियोजित कटाप्रमाणे पुरावे नष्ट करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज पहिलेच गायब केले गेले का ? असे अनेक सवाल निर्माण होतात.