अझहर शेख, नाशिक: दडवून ठेवलेली स्फोटके असो किंवा मग अमली पदार्थांचा साठा शोधण्यात तरबेज ‘बेल्जियन मेलिनोइस’ प्रजातीचे श्वान शहर पोलिसांच्या बॉम्ब शोधक-नाशक पथकाच्या ताफ्यात बुधवारी (दि.३) दाखल झाले. अमेरिकी सैन्याने याच प्रजातीच्या श्वानांच्या मदतीने आयईएसआयचा म्होरक्या अबुबकर अल बगदादीला शोधून ठार मारले होते. यानंतर व्हाइट हाऊसच्या सुरक्षेसाठीसुद्धा या प्रजातीच्या श्वानांना तैनात करण्यात आले आहे. या श्वानाच्या आगमनाने शहर बीडीडीएसची ताकद वाढली आहे.
नाशिक शहर पोलीस दलाच्या बॉम्ब शोधक-नाशक पथकाकडे लॅब्रोडोर जातीचे ‘लकी’ हे श्वान आहे. मागील वर्षी २५ फेब्रुवारी रोजी त्याचा साथीदार ‘स्निफर स्पाइक’ हा पोलीस दलातून दहा वर्षांची प्रदीर्घ सेवा बजावून निवृत्त झाला होता. त्यानंतर लकी हा एकाकी पडला होता. बीडीडीएसला आणखी एका श्वानाची गरज प्रकर्षाने जाणवत होती. पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, उपायुक्त पौर्णिमा चौगुले, संजय बारकुंड यांनी श्वान खरेदीसाठी प्रयत्न सुरू केले. आयुक्तालयाकडून ‘फँटम कॅनाइन्स’शी संपर्क साधण्यात आला. त्यांनी त्यास सकारात्मकता दर्शविली. राज्यातील विविध शहरांच्या पोलीस दलांना तरबेज श्वान पुरविण्याचा अनुभव असलेल्या या कॅनाइन्सकडून नाशिक शहर पोलीस दलाला थेट बेल्जियन मेलिनोईस प्रजातीच्या श्वानाचे दोन महिन्यांचे पिलू उपलब्ध करून दिले. बुधवारी या नव्या सदस्याच्या आगमनाने ‘लकी’ तर आनंदी झालाच मात्र बीडीडीएसचे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही आनंद द्विगुणित झाला.
नवा सदस्य ‘अल्फा’ नामकरण
डॉबरमॅन, जर्मन शेफर्ड, लॅब्रोडोरसारख्या प्रजातीच्या श्वानापेक्षा कितीतरी पटीने जास्त वेगवान व दडविलेली स्फोटके, बॉम्बसदृश वस्तूंचा शोध घेण्यात सक्षम असलेले ताकदवान श्वान म्हणून ओळखले जाणारे बेल्जियन मेलिनोईस श्वानाचे पोलिसांनी ‘अल्फा’ असे नाव ठेवले आहे.
राज्यात या प्रजातीचे तरबेज श्वान गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा यासारख्या नक्षलवादी प्रभावित जिल्ह्यांच्या पोलीस दलाकडे आहेत. याशिवाय नागपूर, नांदेड, कोल्हापूर, सोलापूर, बीड, लातूूर जिल्ह्यांच्या पोलिसांच्या ताफ्यातही या श्वानांना अलीकडे स्थान देण्यात आले आहे. उत्तर महाराष्ट्रातील पोलीस दलात नाशिकच्या रूपाने पहिल्यांदाच या आगळ्यावेगळ्या क्षमता ठेवणाऱ्या श्वानाने ‘एंट्री’ केली आहे.
...म्हणून या श्वानाची बीडीडीएसला गरज
नाशिक शहरात अत्यंत महत्त्वाची ऐतिहासिक धार्मिक स्थळे आहेत. त्याशिवाय केंद्र सरकारच्या अखत्यारीतील संरक्षण खात्याची विविध लष्करी केंद्रेही कार्यान्वित आहेत. राज्याच्या पोलिसांना धडे देणारी अकादमी, चलार्थपत्र मुद्रणालयासारखी (नोट प्रेस) संवेदनशील आस्थापना शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कार्यान्वित आहे. याशिवाय नाशिक रोडसारखे मोठे रेल्वेस्थानकही आहे, तसेच अतिमहत्त्वाच्या व्यक्तीचेही दौरे यामुळे बीडीडीएसला अशा धाडसी व शक्तिशाली श्वानाची गरज होती.
"बेल्जियन हे श्वान अन्य प्रजातींच्या श्वानांच्या तुलनेत लवकर थकत नाही. या श्वानाची आयुमर्यादाही १२ ते १४ वर्षे असते. दोन महिन्यांचे हे श्वान बीडीडीएसकरिता घेण्यात आले आहे. लहानपणापासून श्वान घेतल्यामुळे त्याकरिता असलेल्या दोन्ही हस्तकांची आज्ञापालन तो अधिकाधिक चांगल्या पद्धतीने करील. हे श्वान अमली पदार्थ, स्फोटके शोधण्यापासून गुन्हेगारांचा माग काढण्यापर्यंत पटाईत आहे. शहर पोलीस दलात प्रथमच या श्वानाचे आगमन झाले आहे", असे पोलीस उपायुक्त (गुन्हे) संजय बारकुंड म्हणाले.